ऑनलाइन लोकमतकोकरूड, दि. 2 - बांबरवाडी (ता. शिराळा) येथील शेततळ्यात पोहायला गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी २ च्या सुमारास घडली असून, याबाबतची नोंद कोकरूड पोलिसात दाखल करण्यात आली आहे.घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, बांबरवाडी येथील गणेश लक्ष्मण कदम (वय ११), अरुण लक्ष्मण कदम (६) व हर्षद हरिबा कदम (८) हे तीन सख्खे चुलत भाऊ बांबरवाडीच्या पश्चिमेला शेततळ्यामध्ये दुपारी दोनच्या सुमारास पोहण्यास गेले होते. या शेततळ्याच्या एका कोपऱ्यात पाणी असल्याने गणेश व अरुण हे दोघे सख्खे भाऊ पाण्यात आंघोळीसाठी उतरले, तर हर्षद हा शेजारीच उभा होता. यावेळी अरुण हा पाण्यात बुडत असताना त्याला वाचवण्यासाठी गेलेला गणेशही पाण्यात बुडाला. हे दोघे पाण्यात दिसत नसल्याने हर्षदने जवळच असलेल्या गणेशच्या आईला सांगितले. त्यानंतर गणेशच्या आईसह वाडीतीललोकांनी शेततळ्याकडे धाव घेतली; मात्र गणेश व अरुण दोघेही सापडले नाहीत. मात्र त्यांचे कपडे शेजारीच असल्याने पाण्यात शोध घेतला असता गणेश व अरुण यांचे मृतदेह सापडले. गणेश व अरुण हे सख्खे भाऊ असून, गणेश हा गुढे येथील कमला माधव विद्यालयात शिकत असून, त्याने ६ वीची परीक्षा दिली आहे, तर अरुण हा अंगणवाडीमध्ये शिकत आहे. गणेश व अरुण यांचे वडील मुंबई येथे माथाडी कामगार आहेत, तर आई बांबरवाडी येथे राहते. याबाबतची नोंद कोकरूड पोलिसात करण्यात आली असून, तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक भगवान शिंदे करत आहेत.
बांबरवाडीत शेततळ्यात बुडून सख्ख्या भावंडांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2017 9:07 PM