ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 25 : पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन कृषी आणि सिंचन क्षेत्रात क्रांती घडविणारे ज्येष्ठ उद्योगपती भंवरलाल जैन यांच्या निधनाने देशातील ठिबक क्रांतीचा प्रणेता आपण गमावला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदरांजली वाहिली आहे.
मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, शेतकऱ्यांचे आयुष्य सुखी आणि समृद्ध व्हावे, हा ध्यास श्री. जैन यांनी आयुष्यभर जोपासला. कृषी क्षेत्रातील नवनवीन प्रयोगांना त्यांनी सदैव चालना दिली. जैव तंत्रज्ञान, कृषी प्रक्रिया उद्योग, सिंचनातील नवनवे प्रयोग आदींबाबत त्यांच्या नेतृत्वाखालील जैन उद्योग समुहाने केलेली कामगिरी महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील कृषी क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण आहे. महात्मा गांधीजींच्या विचारांवर निष्ठा असणारे श्री. जैन हे तरुणांसाठी उद्मशीलतेचे नेहमीच प्रेरणास्त्रोत राहिले आहेत. भारतीय शेतीला आधुनिकतेची दिशा देणारा, त्यासाठी सदैव प्रयोगशील राहणारा आणि सामाजिक बांधिलकी जोपासणारा द्रष्टा उद्योजक आपण गमावला आहे.