अनंत जाधव
सावंतवाडी : मुळचे सांगलीकर असलेले सहित्यिक प्रा. काशीनाथ बंडो वाडेकर यांनी आपले अर्धे आयुष्य सावंतवाडीत प्राध्यापक म्हणून काढले आहे. प्राध्यापक आणि एक यशस्वी साहित्यिक असा त्यांचा प्रवास थक्क करणारा होता. त्यांच्या निधनामुळे सिंधुदुर्गाचीसाहित्य चळवळ पोरकी झाली आहे.
येथील साहित्य चळवळीचा त्यांनी जवळून अभ्यास केला होता. आरती मासिकातील मात्रा आणि वेलांट्या हे सदर तर त्यांचे खूपच गाजले होते. त्यांच्या या सदरांची दखल खुद्द कवीवर्य मंगेश पाडगावकर यांनी ही घेतली होती. तसेच त्यांच्या या पुस्तकाला त्यांनी प्रस्तावनाही दिली होती.प्रा. काशीनाथ वाडेकर हे मूळचे सांगली येथील पण त्यांनी आपल्या आयुष्यातील बराच काळ हा सावंतवाडीमध्ये घालवला. ते येथील पंचम खेमराज महाविद्यालयात मानसशास्त्र विषयाचे प्राध्यापक होते. त्यामुळे त्यांचे विद्यार्थी वर्गाबरोबरच सावंतवाडीतील सर्वच क्षेत्रातील नागरिकांशी त्यांचे जवळचे संबध होते. वाडेकर सरांना पूर्वीपासूनच लेखनाची आवड होती. त्यामुळे त्यांनी आपला बराच काळ हा सिंधुदुर्गातील सहित्य क्षेत्रात घालवला.
त्यानंतर मात्रा व वेलांट्या या नावाने पुस्तकही प्रसिद्ध झाले. त्याला पाडगावकर यांनी खास अशी प्रस्तावनाही दिला होती. अनेक जण आरती मासिकातील मात्रा व वेलांटी हे सदर वाचण्यासाठी उत्सुक असायचे. त्यामुळे मात्रा व वेलांटीमुळे सरांचे विशेष नाव झाले आणि ते साहित्य क्षेत्रात नावारूपास येऊ लागले.सावंतवाडीत मराठी साहित्य संमेलन झाले. त्याच्या आयोजनातही सरांचा मोठा वाटा होता. सर फु. मा. भावे या राज्यस्तरावर संस्थेचे सहकार्यवाह म्हणून काम पाहात होते. ते आणि कै. प्रा. रमेश चिटणीस यांच्यात चांगला स्नेह होता.
चिटणीस यांचे निधन झाल्यानंतर प्रा. वाडेकर यांनी त्यांच्यावर विशेष असे आनंदयात्री हे पुस्तक लिहले होते. आणि ते स्वखर्चाने प्रसिद्ध केले होते. सावंतवाडीत असताना त्यांनी अनेक कथा कादंबऱ्याही लिहील्या आहेत. अनेक लेखकांच्या कथा कादंबऱ्यांवर समिक्षा किंवा चर्चा ते घडवून आणत असत. सावंतवाडीतील नाट्यदर्शन चळवळीशी त्यांचा जवळचा संबध होता. त्यानी अनेक नाटकात स्वत: हून काम केले आहे.साहित्य चळवळीशी जोडले गेल्याने त्यांना अनेक पुरस्कारही प्राप्त झाले होते. सावंतवाडीत झालेल्या विद्रोही साहित्य संमेलनाला वाडेकर सर यांनी खास उपस्थिती लावली होती. सिंधुदुर्गमध्ये साहित्याच्या संबधित कोणतेही काम असले की वाडेकर सर पुढे असायचे.
आपली ३५ वर्षे त्यानी प्राध्यापक म्हणून सावंतवाडीत घालवली. या काळात ते शहरातील माठेवाडा भागात राहात असत. पंचम खेमराज महाविद्यालयातून ते निवृत्त झाल्यानंतर त्यांनी आपल्या मूळ सांगली येथे जाणे पंसत केले. मात्र त्यांचे सावंतवाडीवरचे प्रेम कमी झाले नाही. कोकण मराठी साहित्य परिषद असो अगर सावंतवाडीतील साहित्यातील कोणतीही घडामोड असू दे वाडेकर सर हे सावंंतवाडीत येणारच, असे ठरले होते.मात्र गेली दोन वर्षे वाडेकर सर हे आजारी होते. त्यामुळे त्याचा संर्पक येथील साहित्याशी कमी झाला होता. आरती मासिकात त्यांनी मागील तीन वर्षापासून लिहीणेही सोडले होते. पण अधूनमधून सावंतवाडीतील नकूल पार्सेकर, उषा परब, उषा भागवत, चिटणीस, संदिप तेंडुलकर यांच्याशी संर्पक होता. ते सावंतवाडीतील अटल प्रतिष्ठानचे सल्लागार म्हणूनही काम करत होते.प्रकाशित पुस्तकेमात्रा आणि वेलांट्या, झुंज वादळांची, पान चुना तंबाखू ही त्यांची विशेष पुस्तके प्रसिद्ध झाली आणि ती गाजलीही. त्यांचा वेगवेगळ्या नाट्य चळवळीत विशेष सहभाग होता.सावंतवाडीत लोकसाहित्य अभ्यास शिबीरप्रा. वाडेकर सर यांनी आपले मोठे योगदान सावंतवाडीतील साहित्य क्षेत्राला दिले आहे. ते महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाचे सदस्य होते. सावंतवाडीमध्ये लोकसाहित्य अभ्यास शिबिरांचे आयोजनही ते करायचे. समग्र क्रांती आंदोलनात लेखणी वाणी मोर्चाद्वारे ते कार्यरत होते. त्यांचे लेखन हे ढंगदार असायचे त्यामुळे ते सर्वांना विशेष आवडायचे आणि वाचक वाचत असत.