मुंबई : विधान परिषदेचे माजी उपसभापती वसंत डावखरे यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील एक समर्थ व समर्पित नेतृत्व हरपल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.
वरिष्ठ नेते डावखरे यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना विखे पाटील म्हणाले की, त्यांचे नेतृत्व प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करून आणि तावून सुलाखून निघाले होते. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक मोठी पदे त्यांनी भूषवली. पण जनतेशी असलेली नाळ त्यांनी कधी तुटू दिली नाही. विधान परिषदेचे उपसभापती म्हणून त्यांनी उत्तम कामगिरी केली. ते एक अत्यंत दिलखुलास व्यक्तीमत्वाचे नेते होते. ते स्वतः कायम हसतमुख असायचे आणि इतरांच्या चेहऱ्यावरही हास्य फुलविण्याचे विलक्षण सामर्थ्य त्यांच्याकडे होते. अशी माणसं अत्यंत विरळी असतात आणि म्हणूनच ती अविस्मरणीयही असतात. त्यामुळे वसंत डावखरे कायम स्मरणात राहतील, असेही विरोधी पक्षनेत्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देताना सांगितले.
महाराष्ट्र विधीमंडळ काँग्रेस पक्ष आणि वैयक्तिकरित्या दिवंगत नेत्याला श्रद्धांजली अर्पण करून डावखरे कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचे विखे पाटील यांनी म्हटले आहे.