कोल्हापूर : ‘वंचित आघाडी’मुळे दलित वर्ग सत्तेपासून वंचित राहण्याची भिती केंद्रीय सामाजिक न्यायराज्यमंत्री रामदास आठवले यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.लोक कॉँग्रेस-राष्ट्रवादीला कंटाळले आहेत. त्यामुळे यापुढच्या काळात दोन्ही कॉँग्रेसना भवितव्य नसल्याने शरद पवार यांनी ‘एनडीए’मध्ये यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आठवले यांनी सुरुवातीला प्रधानमंत्री आवास योजना, मुद्रा, रमाई योजना, दिव्यांगांना साहित्य वाटप, आंतरजातीय विवाह, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, प्रधानमंत्री सुरक्षा योजना या सर्व योजनांचा आढावा घेऊन त्यांची आकडेवारी सादर केली.प्रकाश आंबेडकर ईव्हीएम मशीनबाबत शंका घेत असल्याबाबत विचारणा केली असता आठवले म्हणाले, ही मशीन्सवरची मतदान पद्धत कॉँग्रेसनेच सुरू केली. एखाद-दुसरे मशीन बाद झाले याचा अर्थ सर्व यंत्रणा चुकीची आहे असे नाही. त्यातूनही काहींना शंका असेल तर त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार करावी.‘वंचित आघाडी’ ही दलितांना सत्तेपासून वंचित ठेवणारी आघाडी असल्याचा आरोप करून आठवले म्हणाले, काही ठिकाणी उमेदवाराचीच ताकद जास्त असल्याने त्यांनी मते खाल्ली. त्यामध्ये ‘वंचित’च्या प्रभावाचा प्रश्न येत नाही. त्यामुळे आंबेडकर यांनी आता ‘एनडीए’सोबत यावे. मात्र आम्हांला ओवेसी चालणार नाही.
विधानसभेला १८ पैकी १० जागा आरपीआय आठवले गटाला मिळाव्यात, विस्तारावेळी मंत्रिपद मिळावे, ५० कार्यकर्त्यांना महामंडळामध्ये स्थान मिळावे, या आपल्या मागण्या आहेत.यावेळी प्रा. शहाजी कांबळे, उत्तम कांबळे, अॅड. पंडित सडोलीकर यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाजपच्या चिन्हावर लढणार नाहीमित्रपक्षांना भाजप कमळ चिन्हावर लढण्याचा आग्रह करीत असल्याबाबत विचारल्यानंतर, ‘कोणत्याही परिस्थितीत आम्ही कमळ चिन्हावर लढणार नाही,’ असे आठवले यांनी स्पष्ट केले. गेल्या वेळीही आम्ही आमच्या चिन्हावर लढलो होतो, याची आठवण त्यांनी करून दिली.आंतरजातीय विवाह वाढण्याची गरजजातिअंतासाठी रोटीबेटीचे व्यवहार वाढले पाहिजेत, अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका होती; परंतु आज वर्षाला देशभरामध्ये केवळ ६० हजारांहून अधिक आंतरजातीय विवाह होत असल्याची आकडेवारी आहे. मात्र ती कमी आहे. विविध योजनांसाठी अर्ज केल्यानंतर हा आकडा मिळाला आहे. मात्र याहीपेक्षा आकडा जास्त असून संबंधित नोंदणी केलेल्या न्यायालयांकडून आकडे घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या असून, आंतरजातीय विवाह वाढण्याची गरज असल्याचे आठवले म्हणाले.४३ हजारांहून अधिक अॅट्रॉसिटीचे गुन्हेदेशभरातून ४३ ते ४७ हजार इतके अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल होत असून यामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान हे आघाडीवर असल्याचे आठवले यांनी सांगितले.७६ हजार कोटींचा निधीआठवले म्हणाले, सामाजिक न्याय विभागाचा वार्षिक निधी ७६ हजार कोटी रुपयांचा असून तो केंद्र शासनाच्या २० विभागांना वितरित करण्यात येतो. त्यातून वैयक्तिक आणि सामूहिक लाभाच्या योजना राबविल्या जातात.