लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शनिवारी राज्यात ठाणे, रत्नागिरी, पुणे, सातारा, चंद्रपूरसह धुळे व नगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह वळवाचा पाऊस झाला. राज्यात इतर ठिकाणी ढगाळ वातावरण होते. मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल परिस्थिती असून १५ मेपर्यंत दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटे आणि दक्षिणपूर्व बंगालच्या उपसागरात पावसाचे आगमन होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़ दुर्घटनेत दोघांचा बळी गेला. शुक्रवारी रात्री आणि शनिवारी सकाळी झालेल्या पावसाने ठाणे जिल्ह्याच्या बहुतांश भागांत वाहतूक विस्कळीत झाली. रेल्वे वाहतुकीलाही फटका बसला. रत्नागिरीतील खेड, मंडणगड, दापोली तालुक्याला शुक्रवारी रात्रीपासून पावसाने झोडपले. खेड तालुक्यात विजेच्या आवाजाच्या धक्क्याने आदित्य अशोक मोरे (१४) याचा मृत्यू झाल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले.पुण्यात रात्री अर्धा तास तर जिल्ह्यात शिरूर, खेड, आंबेगाव तालुक्यात वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. सातारा जिल्ह्यात माण, खटाव, महाबळेश्वर, खंडाळा, वाईत पाऊस झाला. अंबेनळी घाटात रस्त्यावर दगड व झाडे पडली आहेत. धुळे परिसरात पावसामुळे वृक्ष उन्मळून पडले. शनिवारी दुपारपर्यंत वीजपुरवठा खंडीत होता. चंद्रपूरमध्ये बल्लारपूर, मूल, सिंदेवाही तालुक्यात पाऊस बरसला. लालपेठ परिसरात काजल गुप्ता (९) हिचा झाड कोसळून मृत्यू झाला. शिर्डीतही पावसाने जोरदार हजेरी लावली.
वळवाच्या पावसाने झोडपले
By admin | Published: May 14, 2017 5:39 AM