कोथरूड : करिश्मा चौकातील कुलकर्णी पथावर दुभाजक लावून रस्ता बंद केल्याने कॅनॉल रस्त्याने येणाऱ्या वाहनांची अडचण झाली आहे, त्यामुळे कर्वेरस्त्याला पर्याय असलेल्या या रस्त्याचा वापर कमी झाला असून, कर्वे रस्त्यावरील वाहनांची संख्या वाढली आहे. मनसेच्या वतीने कॅनॉल रस्त्यावरील दुभाजक हटविण्याची मागणी महापालिकेचे आयुक्त आणि पथ विभागाच्या मुख्य अभियंत्यांकडे करण्यात आली आहे. कर्वेरस्त्याला पर्याय म्हणून कॅनॉलरस्त्याची निर्मिती करण्यात आली. वारजे हायवे चर्च पासून सुरू होणारा हा कॅनॉल रस्ता आंबेडकर चौक, मावळे आळी, कामना वसाहत, राहुलनगर, करिश्मा सोसायटी, एसएनडीटी, प्रभातरोड पर्यंत आहे; पण करिश्मा सेसायटी चौकात या रस्त्यावर दुभाजक टाकल्यामुळे रोजच वाहतूककोंडी होत असून, रस्ता असूनही तो वापरण्यास अडचण निर्माण झाली आहे. कोंडी टाळावी म्हणून तातडीने येथील दुभाजक हटवावेत, अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली. मंदार बलकवडे, गजानन मेहंदळे, सुरेखा होले, समीर बलकवडे, राजेश गायकवाड, हर्षल गांधी, मनीष अंतुरकर, वैभव सरडे, गणेश शेडगे यांनी याबाबत निवेदन दिले आहे. वाहतूक पोलीस निरीक्षक बाळकृष्ण अंबुरे यांनी सांगितले की, मुख्यरस्त्यावरील वाहतुकीच्या प्रवाहाला होणारा अडथळा या दुभाजकामुळे टळला आहे. वाहतूक सुरळीत झाली आहे. दुभाजक नसतानाच्या काळात निंबाळकर बागेकडून येणाऱ्या वाहनांना कॅनाल रस्त्यावरील येणाऱ्या वाहनांचा अडथळा येत होता. त्यामुळे येथे दुभाजक बसविले आहेत.>कर्वेरस्त्यावरील वाहतूक- कोंडी कमी करण्यात प्रशासन अयशस्वी ठरले आहे. पर्यायी रस्त्यावर वाहतुकीला वाव दिल्यास नागरिकांची गैरसोय दूर होईल. - मंदार बलकवडे
दुभाजकामुळे कॅनॉल रस्ता अडला
By admin | Published: June 13, 2016 1:32 AM