मुंबई - शिवसेनापक्षप्रमुख आणि मुख्यमंत्रीपद अशा दोन आघाड्यांवर उद्धव ठाकरे विरोधकांना तोंड देत आहेत. त्यातच प्रथमच सरकारमध्ये सामील होऊन उद्धव ठाकरे प्रत्यक्ष काम पाहात आहेत. राज्याची जबाबदारी खांद्यावर असल्यामुळे उद्धव यांचे पक्ष संघटनेकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. या स्थितीत शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांवरील भार वाढवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते.
उद्धव यांची पक्षावर घट्ट पकड आहे. मात्र राज्याची जबाबदारी पार पाडताना ही पकड सैल होऊ शकते. अशा स्थितीत वरिष्ठ नेत्यांना साथीला घेऊन आणि नव्या चेहऱ्यांकडे जबाबदारीचे वाटप करण्याचा पक्ष नेतृत्वाचा मानस आहे. त्यानुसार पक्ष संघटनेत खांदेपालट होणार असल्याचे समजते.
राज्यात त्रिशंकू स्थिती झाली असताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे खेचून आणले आहे. उद्धव यांच्या कुशल संघटनामुळे आणि निर्णयांमुळे हे शक्य झालं आहे. मात्र आता स्वत: पक्षप्रमुखच मुख्यमंत्री झाल्याने त्यांना मंत्रालयातूनच सर्व सूत्र हलवायची आहेत. त्यातच तीन पक्षांचे सरकार असल्यामुळे तिन्ही पक्षातील नेत्यांशी समन्वय ठेवण्याचे शिवधनुष्य त्यांना पेलायचे आहे.
दरम्यान पक्ष संघटनेतील संपूर्ण माहिती उद्धव ठाकरे यांना देण्यासाठी एक पद तयार करण्यात येण्याची शक्यता आहे. यातून पक्ष बांधणी करता येणार असून 2024 विधानसभेसाठी शिवसेनेने कंबर कसली आहे.