- रमाकांत पाटील / आॅनलाईन लोकमत
नंदुरबार, दि. 16 - पिढ्यांपिढ्यापासून सातपुड्यातील आदिवासींच्या उदरनिर्वाहासाठी मोठा आधार ठरलेल्या आमसूल व्यवसायाने यंदा आदिवासींच्या पदरी निराशाच आली आहे. निसर्गाच्या कृपेमुळे यंदा हंगाम चांगला झाला असला तरी गेल्या वर्षाच्या तुलनेत आमसूलला निम्मेच भाव मिळाल्याने आमसूलचा गोडवाच हरविल्याचे चित्र आहे.सातपुड्यात दोन लाखांहून अधिक गावरान आंब्यांची झाडे आहेत. याशिवाय आदिवासी उत्थान कार्यक्रम व इतर माध्यमातून तीन लाखांहून अधिक आंब्यांच्या झाडांची नवीन लागवड झाली आहे. त्यामुळे या भागात आंब्याचे मोठे उत्पन्न येते. या भागात आदिवासींना कुठलाही रोजगार नसल्याने आंब्याच्या कैरीपासून येथील आदिवासी आमसूल बनवितात. दरवर्षी एप्रिल ते जून या भागातील आदिवासींचा मुक्काम आंब्याच्या झाडाखालीच असतो. अख्खे कुटुंब कैरीपासून आमसूल बनविण्याच्या कामात व्यस्त असते. आमसूलपासून मिळणारे उत्पन्न हे आदिवासींच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन बनते. यावर्षी आंब्याच्या हंगाम चांगला आला. ऐन बहराचा काळात वादळवारा नसल्याने मोहरही चांगला बहरला होता. परिणामी आंब्याचे उत्पन्नही चांगले आले. त्यामुळे आमसूलचे उत्पादनही वाढले. यावर्षी सातपुड्यात जवळपास पाच हजार क्विंटलहून अधिक आमसूल तयार करण्यात आले असून येथील आदिवासींनी तो स्थानिक व्यापाऱ्यांकडे विकला, परंतु सुरुवातीला अतिशय कमी म्हणाले जेमतेम ४० ते ६० रुपये प्रति किलो भाव मिळाला. पुढे काही प्रमाणात वाढून तो जास्तीत जास्त १२० रुपये किलोपर्यंत गेला. हा भाव गेल्या वर्षाच्या तुलनेत ४० टक्केंपर्यंतच होता. गेल्यावर्षी चांगल्या मालाला २५० ते ३०० रुपये किलोप्रमाणे भाव मिळाला होता. पण यंदा भाव न मिळाल्याने उत्पन्न येवूनही आदिवासींच्या नशिबी निराशाच आली आहे. सातपुड्यातील जवळपास ३० हजारापेक्षा अधिक कुटुंबांचा उदरनिर्वाह आमसूल व्यवसायावर आहे. काही कुटुंब रोजगारासाठी बाहेर जात असल्याने अशा कुटुंबांकडून इतर लोक मोहर येण्याच्या काळात आंब्याची झाडे प्रती झाडाप्रमाणे हंगामासाठी भाडेतत्वावर घेत असतात. ज्या लोकांनी भाडेतत्वावर झाडे घेतली होती त्यांनी त्या काळची परिस्थिती पाहून झाड मालकांना चांगला भाव दिला. पण प्रत्यक्षात मात्र आमसूलचे दर नसल्याने त्यांनाही त्यात नुकसान झाल्याची प्रतिक्रिया आदिवसींची आहे.यावर्षी आपण आपल्या स्वत:चे १२ आंब्याचे झाडे तसेच इतर भाडेतत्वार ४० झाडे घेतली होती. उत्पन्न चांगले असल्याने आपण बाहेर गावाची नोकरी सोडून आमसूल तयार करण्यासाठी आई-वडिलांच्या मदतीला आलो. पण भाव न मिळाल्याने अपेक्षित रक्कम मिळू शकली नाही. त्यामुळे दोन महिने राबून हातात फार काही शिल्लक नसल्याचे रामसिंग पाडवी यांनी सांगितले.