-विकास राऊत, औरंगाबाद
मराठवाड्यातील दुष्काळझळांचा फटका पशुधनालाही बसत आहे. विभागात सध्या ५५ लाखांच्या आसपास लहान-मोठे जनावरे आहेत. एवढ्या मोठ्या तोंडांना दररोज अंदाजे ५ ते ६ लाख टन चारा लागतो. सध्या या जनावरांचे पोट भरत आहे, मात्र पाऊस लांबला तर त्यांना विचविण्याचे मोठे आव्हान असणार आहे.मराठवाड्याची अवस्था सध्या वैराण वाळवंटाप्रमाणे झाली आहे. जनावरांच्या चाऱ्यासाठी, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना करावी लागणारी वणवण, कोरडे पडलेले प्रकल्प, शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या आणि निर्माण झालेल्या पाणीटंचाईमुळे सर्वांचे लक्ष आभाळाकडे लागले आहे.विभागात सध्या तरी चाराटंचाई नाही. त्यामुळे चाऱ्यासाठी अजून नियोजन केलेले नाही; परंतु पाऊस लांबला तर अडचण येऊ शकते. चाऱ्यासाठी छावण्यांचे नियोजन करण्याचे आदेश आहेत. विभागातील यंत्रणेकडून चालू वर्षातील पशुधनाच्या माहितीचा अहवाल मागविण्यात येत आहे, असे महसूल उपआयुक्त जितेंद्र पापळकर यांनी सांगितले.
आठ जिल्ह्यांतील जनावरांची संख्या...
जिल्हा | लहान | मोठी | एकूण |
औरंगाबाद | १,२४,९७८ | ५,५०,७२४ | ६,७५,७०२ |
जालना | १,४१,८७२ | ४,७३,९०७ | ५,१५,७७९ |
परभणी | ८४,७३२ | ३,६१,९३२ | ४,४६,६६४ |
हिंगोली | ६०,६८२ | ३,०३,२१ | ३,६३,८९२ |
नांदेड | २,०३,०२५ | ६,८६,०९० | ८,८९,११५ |
बीड | १,५७,१६६ | ६,६८,२६८ | ८,२५,४३४ |
लातूर | १,४४,९३२ | ४,५५,२१४ | ६,००,१४६ |
उस्मानाबाद | १,१३,७९१ | ४,१२,४१४ | ५,२६,२०५ |
एकूण | १०,३१,१७८ | ९,११,७५९ | ४९,४२,९३७ |