नारायणगाव : कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील पाच धरणांमध्ये अवघा ५.९६ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिल्याने पुढील काळात पिण्याची पाण्याची परिस्थिती गंभीर होणार आहे. या दोनही तालुक्यांना प्रथमच दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत साडेआठ टक्के पाणी कमी झाले आहे़. सध्या पुणे, नगर, सोलापूर, बीड या जिल्ह्यांसाठी सोडण्यात आलेले पाणी अद्यापही सुरू असून, ३ ते ४ मेपर्यंत हे पाणी कुकडी डावा कालव्यामधून सुरू राहणार आहे़ जुन्नर तालुक्यात येडगाव, माणिकडोह, वडज, पिंपळगाव जोगा, तर आंबेगाव तालुक्यातील डिंभा धरण ही पाच धरणे आहेत़ या पाच धरणांच्या पाणीसाठ्यावर जुन्नर, आंबेगावसह पारनेर, श्रीगोंदा, करमाळा, कर्जत या तालुक्यांचे नियोजन अवलंबून आहे. जुन्नर व आंबेगाव तालुक्याला पहिल्यांदाच दुष्काळ सदृश परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे़ पहिल्यांदाच अवघा ५.९६ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे़ या पाणीसाठ्या पैकी बहुतांश पाणी बाष्पिभवनात जाणार आहे. त्याचाही परिणाम या साठ्यावर होणार आहे़ पिंपळगाव जोगा धरणातील मृतसाठ्यातील पाणी दरवर्षी सर्वांना दिलासा देणार ठरते, मात्र यावर्षी मृतसाठ्यातून २.३ टीएमसी पाणी चार जिल्ह्यांसाठी सोडण्यात येणार आहे़ त्यात आज अखेर १४०० दलघफूट पाणी कुकडी डावा कालव्याद्वारे सोडण्यात आले आहे़ हे पाणी ६ ते ७ मे पर्यंत सुरू राहणार आहे़ पिंपळगाव जोगा धरणातील मृतसाठा कमी झाला असून, सध्या २५०३ दलघफूट पाणीसाठा शिल्लक आहे, अशी माहिती कुकडी पाटबंधारे विभाग क्ऱ १ चे कार्यकारी अभियंता जी़ बी़ नन्नोर यांनी दिली़ सद्य:स्थितीत सर्व धरणे मिळून अवघे १५१५ दलघफूट (४.९६ टक्के) साठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी आजमितीस ७३५७ दलघफूट (१३.५१ टक्के) साठा होता. गेल्या वर्षाच्या तुलनेत साडेआठ टक्के साठा कमी आहे. पाच धरणांपैकी आंबेगाव तालुक्यातील डिंभा धरणाची परिस्थितीदेखील यावेळी अत्यंत गंभीर आहे. (वार्ताहर)>४माणिकडोह धरणमार्गे घाटघर रस्त्यावरील सर्वच आदिवासी गावांतील पाणीपुरवठा योजना बंद पडलेल्या आहेत. राजूर नं. १, राजूर नं. २, पेठेचीवाडी, निमगिरी, देवळे, अंजनावळे ही गावे अगदी माणिकडोह धरणाच्या बॅकवॉटरलगत वसलेली आहेत. ही सर्व गावे कुकडी नदीच्या खोऱ्यात मोडतात. >४परंतु उन्हाळ्यात मात्र या गावात चांगलेच पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवते. मुळात पाणीसाठा असताना तांत्रिक अडचणी, निकृष्ट काम, यामुळे कशाबशा अवस्थेत रडतकढत सुरू असणाऱ्या पाणीपुरवठा योजना प्रामुख्याने बंद पडलेल्या आहेत. आदिवासी भागातील जवळपास सर्वच गावे खासगी पाण्याच्या स्रोतांवरच आता प्रामुख्याने अवलंबून आहेत. >४येडगाव धरणालगत बहुतांश गावांच्या नळपाणी योजना असल्यानेहे पाणीपुरवठ्यासाठी प्रमुख धरण मानले जाते़ या धरणामध्ये आजमितीस १०६२ दलघफूट (३७.९१ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे़ माणिकडोह धरणामध्ये आजमितीस ३१ दलघफूट (०.३१ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे़ वडज धरणामध्ये आजमितीस ९४ दलघफूट (७.९९ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे़ पिंपळगाव जोगा धरणामध्ये ० टक्के साठा शिल्लक आहे़
धरणे असूनही दुष्काळाचे सावट
By admin | Published: April 28, 2016 2:17 AM