पुणे : राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना सुटीच्या कालावधीतही शालेय पोषण आहार देण्यात यावा, अशा सूचना राज्याच्या प्राथमिक शिक्षण विभागातर्फे दुष्काळी भागातील शाळांना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे दुष्काळाची एकूण परिस्थिती जाणून घेतल्यानंतर शनिवार, रविवारीही शालेय पोषण आहार पुरविण्याबाबत शाळांना कळविले जाणार आहे.शालेय पोषण आहार ही योजना केंद्र शासन पुरस्कृत असून, केंद्राच्या सूचनेनुसार दुष्काळी परिस्थितीत विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार देणे बंधनकारक आहे. राज्याच्या महसूल विभागाने जाहीर केलेल्या दुष्काळी जिल्ह्यातील व तालुक्यातील पात्र शाळांमध्ये शालेय पोषण आहार पुरविला जाईल याची दक्षता घ्यावी, असे परिपत्रक राज्याचे अवर सचिव प्रकाश साबळे यांनी काढले आहे.दिवाळीच्या सुटीत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आहार पुरविणे आवश्यक आहे. मुख्याध्यापक, शिक्षकांनी नैसर्गिक आपत्तीमध्ये कोणतीही कारणे न सांगता पोषण आहार पुरवावा, असे आवाहन प्राथमिक शिक्षण संचालक महावीर माने यांनी केले आहे.
दुष्काळामुळे विद्यार्थ्यांना सुटीतही पोषण आहार
By admin | Published: September 16, 2015 12:35 AM