उमेश जाधव, ऑनलाइन लोकमत
टिटवाळा, दि. ७ - वनपरिक्षेत्र कल्याण मधील विविध ग्रामीण शाळांमध्ये 1 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर मध्ये जागतिक वन्यजीव सप्ताहानिमित्ताचे औचित्य साधून वन्यजीव संरक्षणासाठी जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सप्ताहाला तालुक्यातील कोलीब,मामनोली या गावातील शाळांपासून सुरूवात केली, तर या सप्ताहाची सांगता मांडा टिटवाळा येथील छत्रपती शिक्षण मंडळाचे विद्यामंदिर शाळेत करण्यात आली. शेकडो विद्यार्थी, शिक्षक, प्राणीमित्र, पर्यावरण दक्षता मंच , सर्पमित्र व वनविभागाचे अधिकारी वन कर्मचारी या सर्वांची मोठ्या प्रमाणावर उपस्थित होती.
वन्यजीव हे आपले शत्रू नसून मित्र आहेत. त्यांचे संगोपन, संरक्षण करणे हे प्रत्येक मानवी जिवाचे अद्य कर्तव्य आहे. वन्यजीवांचे निसर्गचक्रातील महत्व तसेच वन्यजीव व त्यांच्या नैसर्गिक अधिवास असणाऱ्या जंगलाचे संरक्षण करण्याची गरज व त्याचे माणवी जीवनावर होणारे परिणाम याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने वनपरिक्षेत्र कल्याण व वनपरिमंडळ कुंदा यांनी या जागतीक वन्यजीव सप्ताहाचे आयोजन केले होते. तालुक्यातील विविध शाळांत हा सप्ताह राबविण्यात आला. सदर सप्ताहाची सांगता टिटवाळा येथील विद्यामंदिर शाळेत करण्यात आली. सकाळी प्रथम भव्य अशी प्रभात फेरी काढण्यात आली. यात वन्यप्राण्यांचे पोषाख परिधान करून व वन्यजीव वाचवा अशा घोषणा देत विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. यानंतर विद्यामंदिर शाळेत वनविभागाचे कल्याण परिक्षेत्राचे वरिष्ठ अधिकारी समिर खेडेकर व वनपरिमंडळ अधिकारी वैभव वाळिंबे, पर्यावरण समितीच्या संगीता जोशी व द्यामंदिर शाळेचे मुख्यध्यापक कुमावत सर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना वन्यजीवांचे आपण संरक्षण व संगोपन का व कसे करावे या संदर्भात उत्तम मार्गदर्शन केले. वनपरिमंडळ अधिकारी वैभव वाळिंबे, कल्याण सर्पमित्र मंडळ व पर्यावरण दक्षता मंचाचे कार्यकर्ते यांनी वन्यजीव विषयक विविध विषयांवर मार्गदर्शन केले. तर विद्यामंदिर शाळेत या सप्ताहा निमित्ताने वन्यजीवांचे आधारीत चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. विजेत्या स्पर्धकांना वनाधिकारी यांचे हस्ते बक्षिसे वाटप करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन कुंदा वनपरिमंडळ अधिकारी वैभव वाळिंबे यांनी केले होते. तसेच विद्यामंदिर शाळेचे विजय सुरोशे सर व इतर शिक्षक कर्मचारी, वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शेकडो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत या सप्ताहाची उत्साहात सांगता झाली.