मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर सातारा जिल्ह्यात पिछेहाट झालेल्या काँग्रेसच्या उदयाला आता कुठं सुरुवात झाली होती. परंतु, जिल्ह्यातील काँग्रेसचे मान-खटाव मतदार संघातील आमदार जयकुमार गोरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे काँग्रेसला धक्का बसला आहे. तर राष्ट्रवादीसमोरच्या अडचणीही वाढण्याची शक्यता आहे. जयकुमार गोरे यांच्यामुळे राष्ट्रवादीची जिल्ह्यातील सत्तास्थाने धोक्यात येण्याची शक्यता आहेच. शिवाय जयकुमार गोरेंच्या प्रवेशामुळे युतीतही पेच निर्माण होणार आहे.
जयकुमार गोरे यांच्या भाजपप्रवेशामुळे युतीसमोरचा पेच वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे शेखर गोरे यांनी आधीच शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे हा मतदारसंघ गोरे बंधुंपैकी कोणाला मिळणार हे गुलदस्त्यात आहे. दुसरीकडे भाजपच्या सातारा जिल्ह्यातील विस्तारासाठी जयकुमार गोरे हुकमी एक्का ठरू शकतात. साताऱ्यातून राष्ट्रवादी हद्दपार करण्यासाठी गोरेंशिवाय दुसरा नेता नाही. तर शिवसेनेने शेखर गोरेंसाठी फिल्डींग लावण्यास सुरुवात केली आहे.
शिवसेना-भाजपमध्ये युती होणार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रत्येक सभेत सांगत आहेत. अशा स्थितीत, मान-खटाव मतदारसंघ कोणाला द्यायचा हा प्रश्न उपस्थित होणार आहे. मतदारसंघात जयकुमार गोरे यांनी वर्चस्व निर्माण केले आहे. त्यांनी भाजप प्रवेशाला पक्षातून विरोध होत होता. परंतु, केंद्रीयमंत्र्यांच्या उपस्थित प्रवेश होत असल्याने पक्षातील विरोध मावळला. तर गोरेंनी देखील भाजप प्रवेशापूर्वी जिहे-कठापूर योजनेत माण तालुक्यातील दुष्काळी गावांचा सामावेश करून घेत टायमिंग साधले. त्यामुळे गोरे यांचे मतदारसंघातील वजन आणखी वाढले आहे.
दरम्यान शिवसेना-भाजप युती तुटल्यास, जयकुमार गोरे-शेखर गोरे यांच्यातच लढत रंगणार आहे. या मतदार संघातून जयकुमार गोरे यांना सर्वच आघाड्यांवर टक्कर देण्यास शेखर गोरे यांच्या व्यतिरिक्त दुसरा नेता नाही. त्यामुळे ही लढत लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे. यात जयकुमार गोरे विजयी झाल्यास, भाजपला राष्ट्रवादीचे वर्चस्व कमी करून साताऱ्यात पक्षविस्तार करणे सोपं होणार आहे.