पुणे : वर्षांनुवर्षे शेतीतील अनिश्चिततेमुळे घरी जेमतेम पोटभरेल एवढेच पिकतं.. त्यातूनही काही विकल तरच गाठीला पैसे शिल्लक राहतो.... त्यातून मुलांच शिक्षण .. दवाखाना, सणसुदाचा खर्च भागवायचा... या स्थितीतून आपल्याला शिक्षणच बाहेर काढेल हा विश्वास असल्याने दहावी आणि बारावी शिकवली... पण आता सततच्या दुष्काळाने नापिकी आल्याने शेतीत काहीच पिकत नाही. त्यामुळे शिक्षण सोडून शेतीत लक्ष घालण्यास सुरूवात केली. मात्र, गेल्या दोन वर्षात पुन्हा पावसाने पाठ फिरविली....त्यापेक्षा यंदाचा दृष्काळ घरच्यांनी सांगितलेल्या कथांपेक्षाही भयानक... त्यामुळे गेल्या दिड महिन्यापासून घरदार सोडून पुण्यात आलोय.. आता हमाली करतोय.. हा अनुभव आहे.. लातूर जिह्यातून कामासाठी पुण्यातील छत्रपती शिवाजी मार्केट मध्ये कामाच्या शोधात आलेल्या तरूणांच्या सुमारे ६० ते ७० तरूण दुष्काळामुळे हाताला काम नसल्याने आले असून नशिबाच्या रेषांवर मात करण्यासाठी सरस्वतीचे हे उपासकांवर लक्ष्मीची कृपा मिळविण्यासाठी हमाली करण्याची वेळ आली आहे. मात्र, मनात काळजी आणि डोळयात लाज लपवून हे दिवसही निघून जातील या भावनेने हे तरूण दिवस काढत आहेत. दुष्काळामुळे अनेक कुटुंबे पुण्यात स्थलांतरीत झाली आहेत. घरी चार एकर जमीन आहे.. पण जिथं प्यायला पाणीच नाही तिथं शेती कुठून करणार... आसपासच्या जिल्ह्यांमध्येही हीच स्थिती... आपल्या नशिबी हाच पाचविला पुजलेला दुष्काळ म्हणून पोटासाठी घरी वृद्ध आई-वडील सोडून याच्या-त्याच्या ओळखीतून पुण्यात आलो... पण इथंही दुष्काळाच्या साडेसातीने साथ सोडलेली नाही. पत्नी आणि मुलांसह गेल्या महिनाभरापासून पुण्यात राहात असलेला नांदेड जिल्ह्यातील भोकर या गावामधून आलेला सुभाष जाधव सांगत होता. घरी चार एकर शेती आहे. मात्र, पाणीच नाही त्यामुळे कामही नाही. घर चालविण्यासाठी पैशाची भ्रांत असल्याने पत्नी आणि मुलांसह पुण्यात आलो. तिथं शेतीत राबून इथल्या लोकांची पोटं भरविण्यासाठी पिकविणारा मी इथं मात्र बिगारी काम करत असल्याचे सांगताना त्याला शब्द जड झाले होते. घरी सहा एकर शेती.. घरात आई-वडील आणि आम्ही दोघे भाऊ. काही वर्षांपर्यंत पाऊसपाणी बरे असल्याने शेतात पिकं घेता येत होती. मात्र, गेल्या दोन वर्षांत पावसाअभावी काहीच पिकंल नाही. आता कामही मिळेना म्हणून पुणे गाठंल. बारावीपर्यंत शिक्षण झाल्याने काहीतरी काम मिळेल म्हणून आलो. आता मार्केट यार्डात हमाली करत असल्याचे लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील कारेपूर येथून आलेला रामराव ठोंबरे सांगत होता. महादेव ठोंबरे याचीही अशीच अवस्था आहे.लातूर जिल्ह्यातील औसामधून रणवीर सोपटे हा दीड वर्षांपूर्वी पुण्यात आला. घरी जेमतेम शेती असल्याने १२वी पर्यंत शिक्षण पूर्ण केलेला रणवीरही मार्केटयार्डात मित्रांसह हमालीच करतो. घरी आई-वडील आणि बहीण आहे. या वर्षी बहिणीचं लग्न करण्याचा निर्णय घरच्यांनी घेतला. त्यासाठी गेल्या वर्षभरापासून घराबाहेर असलेल्या सोमनाथने काहीतरी हातभार लावावा अशी घरच्यांची इच्छा आहे. मात्र, या वर्षभरात कधी काम मिळाले तर कधी उपाशी राहायची वेळही आली. त्यामुळे पैसे शिल्लक राहत नाहीत. घरी जायचं तर मोठा खर्च होणार, म्हणून तो घरीही गेलेला नाही.
दुष्काळाच्या झळा : शिक्षण असूनही नशिबी हमालीच...
By admin | Published: March 13, 2016 1:56 AM