ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 3 - उन्हाळ्यासोबतच आता पावसाळ्यातही स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून येत आहे. यामुळे सामान्यांमध्ये या रोगाला घेऊन भीतीचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, पावसाळ्यातील दमट वातावरण या रोगाच्या विषाणूसाठी पोषक ठरत आहे. परिणामी, रोगाचा उद्रेक तर होणार नाही, अशी शंका व्यक्त केली जात आहे. सोमवारी एक ३८ वर्षीय युवक स्वाईन फ्लू पॉझिटिव्ह आला असून एका ५१ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. नागपूर विभागात आता रुग्णांची संख्या १३० वर गेली आहे, तर मृत्यूची संख्या ३६ झाली आहे. सविता शर्मा (५१) रा. नागपूर असे मृताचे नाव आहे. या वर्षी उन्हाळ्यात स्वाईन फ्लूचे सर्वाधिक रुग्ण दिसून आले. मे महिन्यात उष्णतेचा पारा ४६ अंशावर गेला असतानाही पॉझिटीव्ह रुग्णांची भर पडत होती. आता पावसाळा सुरू झाल्याने हे रुग्ण वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यातच सोमवार ३ जुलै रोजी पॉझिटीव्ह आलेला ३८ वर्षीय रुग्ण हा गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी गावातील आहे. मेडिकलच्या स्वाईन फ्लूच्या वॉर्डात तो उपचार घेत आहे. तर मृत सविता शर्मा गेल्या काही दिवसांपासून एका खासगी इस्पितळात स्वाईन फ्लूवर उपचार घेत होत्या. त्यांच्या मृत्यूने विभागात मृत्यूची संख्या ३६ वर गेली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या नोंदीनुसार नागपूर शहरातील रहिवासी असलेले ६८ रुग्ण या रोगाने बाधित असून १९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मेडिकलच्या डॉक्टरनुसार, पाऊस वाढल्याने अलीकडे ताप व सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढले आहेत. यामुळे स्वाईन फ्लू संशयितांची संख्या वाढण्याचीही शक्यता आहे.
स्वाईन फ्लूची भीती कायम, आणखी एका रुग्णाचा मृत्यू
By admin | Published: July 03, 2017 10:33 PM