मुंबई : देवनार डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याला गुरुवारी सकाळी लागलेल्या आगीच्या धुराने तीन दिवसांपासून पूर्व उपनगरातील नागरिकांच्या नाकीनऊ आले आहेत. शनिवारी सकाळी ही आग आटोक्यात आल्याचा दावा महापालिकेने केला आहे. प्रत्यक्षात मात्र आगीच्या धुराचे लोट पूर्व उपनगरासह पश्चिम उपनगर आणि शहरातल्या वातावरणात पसरले आहेत. परिणामी, येथील प्रदूषणाचे प्रमाण वाढले असून, वाढत्या प्रदूषणामुळे मुंबईकरांनी संताप व्यक्त केला आहे.ही आग आटोक्यात आणण्यासाठी महापालिका आणि मुंबई अग्निशमन दल दोन दिवसांपासून अथक प्रयत्न करत आहे. आग पूर्णपणे नियंत्रणात यावी, यासाठी मुंबई अग्निशमन दलाच्या वतीने घटनास्थळी १४ फायर इंजिन, ८ पाण्याचे टँकर्स, अग्निशमन विषयक अत्याधुनिक यंत्रसामुग्री यासह अग्निशमन दलाचे २१ अधिकारी व १३२ जवान पाठवण्यात आले आहेत.आग लवकर नियंत्रणात यावी, यासाठी २ मिनी वॉटर टेंडरही वापरण्यात येत आहे, तसेच आग लवकर नियंत्रणात यावी, यासाठी मिनी वॉटर टेंडरमधील पाण्यामध्ये १५० लीटर्स एवढे जेट कूल सोल्युशन मिसळविण्यात आले आहे. अशा प्रकारच्या सोल्युशनचा वापर मुंबई अग्निशमन दलाद्वारे प्रथमच करण्यात येत आहे. तीन दिवस धुराचा त्रास होत असूनही, पालिकेने नागरिकांच्या आरोग्याप्रती निष्काळजी दाखविल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे. (प्रतिनिधी)आगीमागे अल्पवयीन मुलांचा हातदेवनार डम्पिंग ग्राउंडवरील संशयास्पद आगीमागे अल्पवयीन मुलांचा हात असल्याचे समोर येत आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात १० ते १२ वर्षांच्या तीन मुलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाची धडपड सुरू असताना १० ते १२ वर्षांची तीन लहान मुले आग लागलेली नाही, अशा भागात आग लावत असल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांचा माग घेईपर्यंत तिघेही पसार झाले होते. या प्रकरणी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून तीन अल्पवयीन मुलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बाळासाहेब जाधव यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले. ७४ शाळा बंददेवनार परिसरात पसरलेल्या धुरामुळे महापालिकेने येथील आपल्या ७४ शाळा शुक्रवारसह शनिवारी बंद ठेवल्या. देवनार, टिळकनगर, पेस्तन सागर, शिवाजीनगर, मानखुर्द, बैंगनवाडी या परिसरातील शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. हवेची गुणवत्ता खराबआगीच्या धुरामुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता खराब झाली असून, पुढील ४८ तासांसाठी हवेची गुणवत्ता खराबच राहील, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.आरोग्याची काळजी घ्याधुराचा त्रास होऊ नये, यासाठी नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून तोंड व नाक झाकले जाईल, अशा पद्धतीने ओला रुमाल बांधावा, तसेच काळा चष्मादेखील वापरावा, अशी सूचना महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे करण्यात आली आहे.धुरक्याबद्दल...धूर आणि धुके यांच्या संयोगाने धुरके (स्मोक आणि फॉग यांच्यामधून स्मोग) तयार होते. या धुरक्यामुळे श्वसनात अडथळे येतात, तसेच दृश्यताही कमी होते. १९ व्या आणि २० व्या शतकामध्ये वाढत्या औद्योगिकरणामुळे निर्माण झालेल्या प्रदूषणामुळे ही संकल्पना पाश्चिमात्य देशांमध्ये तयार झाली. कोळश्याचे ज्वलन, वाहनांमधून, उद्योगांतून येणारा धूर, शेती व जंगले जळल्यामुळे होणारा धूर यास कारणीभूत असतो. लंडन, मेक्सिको सिटी, बीजिंग, तसेच अमेरिकेतील अनेक शहरांमध्ये धुरके वारंवार आढळते.पर्यावरणावरीलपरिणामांची चौकशी करामुंबई भाजपा अध्यक्ष आणि आमदार अॅड. आशिष शेलार, महापालिका भाजपा गटनेते मनोज कोटक यांनी देवनार डम्पिंगला लागलेल्या आगीची पाहणी केली. त्यानंतर या आगीमुळे पर्यावरणावर झालेल्या परिणामांची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी केली आहे. घटनास्थळाला भेट दिल्यानंतर शेलार यांनी मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून ही आग कशी लागली, ती विझविण्यास विलंब का झाला, तसेच या आगीमुळे झालेल्या प्रदूषणाचा मुंबईकरांवर झालेला परिणाम, या सर्व बाबींचा विचार करून या आगीची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली.
देवनारच्या आगीमुळे कोंडला श्वास
By admin | Published: January 31, 2016 2:21 AM