मुंबई : मशीद रेल्वे स्थानकालगतच्या दाणाबंदर परिसरातील झोपड्यांसह गोदामांना सोमवारी सायंकाळी ६च्या सुमारास आग लागली. या आगीमुळे मध्य रेल्वेच्या फास्ट लाइनवरील ट्रेन थांबविण्यात आल्याने लोकल सेवेचा बोजवारा उडाला. या आगीत सहा जण जखमी झाले. रमज़ान इमरान शेख (१३), सलमान इमरान खान (१२), जिरो (१२), रहेमान शेख (१०), विनायक आणि समीर अशी जखमींची नावे आहेत. जखमींवर जे.जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दाणाबंदर परिसर मध्य रेल्वेच्या संरक्षक भिंतीला लागून असल्याने याचा विपरित परिणाम रेल्वे वाहतुकीवर होऊ नये, म्हणून मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील सेवा थांबविण्यात आली होती. यात २० लोकल फेऱ्या रद्द कराव्या लागल्या तर ६० पेक्षा अधिक फेऱ्यांना लेटमार्क लागला. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी लोकल खोळंबल्याने प्रवाशांचे हाल झाले. मशीद येथे मोठ्या प्रमाणावर गोदामे आहेत. गोदामांलगत झोपड्या आहेत. मुळात दाणाबंदर हा परिसर मध्य रेल्वेच्या संरक्षक भिंतीला लागून आहे. येथील पंधरा ते वीस गोदामांसह झोपड्यांना सोमवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केले. मुळात हा परिसर मध्य रेल्वेला लागून असल्याने रेल्वेला याचा फटका बसू नये, म्हणून मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील सेवा अनिश्चित काळासाठी थांबविण्यात आली होती. दुसरीकडे आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाकडून घटनास्थळी १२ फायर इंजिन पाठविण्यात आले. शिवाय घटनास्थळी झालेल्या गर्दीला थोपविण्यासाठी पोलीसही तैनात करण्यात आले. अग्निशमन दलाकडून आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असतानाच आगीत सहा जण जखमी झाल्याचे समोर आले. जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरू असल्याचे अग्निशमन दलातर्फे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
आगीमुळे मरेही खोळंबली
By admin | Published: January 24, 2017 4:48 AM