आयारामांची गोची; महापुरामुळे पक्षांतरावर लागला 'ब्रेक'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 04:54 PM2019-08-13T16:54:59+5:302019-08-13T16:55:46+5:30
राष्ट्रवादी नेते बार्शीचे आमदार दिलीप सोपल शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे बोलले जात होते. तर भाजपच्या महाजनादेश यात्रेत सोलापुरातील काँग्रेस आमदार सिद्धराम म्हेत्रेही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. परंतु, महापूर आणि त्यात महाजनादेश यात्रा रद्द झाल्याने पक्षांतरवर मोठा ब्रेक लागला आहे.
मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्यात मोठ्या प्रमाणात पक्षांतर झाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील ३० हून अधिक नेत्यांनी आतापर्यंत भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केला. यापैकी सर्वाधिक नेत्यांनी भाजप गाठले. परंतु, या पक्षांतराला गेल्या काही दिवसांपासून ब्रेक लागला आहे. सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांत आलेल्या भीषण पूरस्थितीमुळे हे पक्षांतर थांबले आहे.
सांगली, कोल्हापूरमध्ये आलेल्या पूरस्थितीच्या वेळी राजकारण करू पाहणाऱ्या राजकीय पक्षांवर सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येते. भाजपच्या महाजनादेश, शिवसेनेच्या जनआशीर्वाद आणि राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा देखील महापुराच्या पार्श्वभूमीवर रोखण्यात आल्या. नैसर्गिक आपत्तीच्या कालावधीत राजकीय हालचाल करणे महाग पडू शकते, यामुळे सत्ताधारी पक्षांसह विरोधीपक्ष काळजी घेत आहे. त्यानुसार सध्या पक्षांतर थांबले आहेत.
विधानसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षातील आणखी ५० नेते भाजपमध्ये सामील होणार असल्याचा दावा काही दिवसांपूर्वीच करण्यात आला होता. पक्षांतराचा पहिला टप्पा पार पडला असून लवकरच दुसरा टप्पा होणार आहे. या टप्प्यात किमान ५० नेते भाजप आणि शिवसेनेत येणार असल्याचा दावा करण्यात आला होता. परंतु, राज्यातील पूरस्थितीमुळे या नेत्यांनीही पक्षांतर करण्यास उसंत घेतली आहे. जेणेकरून सोशल मीडियातून आपल्यावर टीका होणार नाही. किंबहुना सत्ताधारी पक्षांकडूनही या आयारामांना सबुरीचा सल्ला दिल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
राष्ट्रवादी नेते बार्शीचे आमदार दिलीप सोपल शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे बोलले जात होते. तर भाजपच्या महाजनादेश यात्रेत सोलापुरातील काँग्रेस आमदार सिद्धराम म्हेत्रेही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. परंतु, महापूर आणि त्यात महाजनादेश यात्रा रद्द झाल्याने पक्षांतरवर मोठा ब्रेक लागला आहे.