ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 08 - इगतपुरी तालुक्यात या वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने तालुक्यातील रस्त्याची वाताहत झाली असून, अनेक ठिकाणचे रहदारीचे पूलही वाहून गेले आहेत. दरम्यान पावसाळा संपून दोन महिने उलटून गेले असतानाही या वाहून गेलेल्या रस्त्याची आणि पुलाची दुरुस्ती करण्याकडे शासनाचे सार्वजनिक बांधकाम विभाग,पंचायत समितीचा बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत आहे. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची दळण-वळण व्यवस्था ठप्प झाली आहे.
दरम्यान, या तुटलेल्या पुलावरून अनेक जणजीवघेणा प्रवास करीत असल्याने या पुलाची आणि रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. इगतपुरी तालुक्यात यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आल्याने अनेक रस्त्यावरील लहान मोठी पूल वाहून गेली होती.तर घोटी सिन्नर रस्त्यासह घोटी शहरातील जुन्या महामार्गाचीही प्रचंड दुरावस्था झाली होती.
इगतपुरी तालुक्यातील शेणवड बु या गावाच्या परिसरात बारा आदिवासी वाड्या असून या वाड्यातील नागरिकांना शहरात येण्यासाठी पेहरेवाडी जवळ मुख्य रस्त्याला जोडण्यासाठी एकमेव रस्ता आहे.या रस्त्यावर बंधाऱ्याच्या पाण्यातून जाण्यासाठी पूल असून या पुलाचे काम करतानाच ते नित्कृष्ट झाल्याची तक्रार ग्रामस्थांनी पंचायत समितीकडे केली होती. पहिल्या मुसळधार पावसातच हा पूल पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला होता. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने या तुटलेल्या पुलाची आणि रस्त्याची दखल न घेतल्याने या भागातील हजारो नागरिकांची दळणवळण व्यवस्था बंद पडली आहे.
या पुलाची आणि परिसरातील रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी आणि रस्ता वहिवाटी साठी सुरु करावा अशी मागणी परिसरातील नागरिकाकडून होत आहे.