लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : देशात १ जुलैपासून जीएसटी लागू होणार असून सरकारला कोट्यवधी रुपयांचा करमणूक कर वसूल करून देणारा करमणूक कर विभागच बंद होणार आहे. वस्तू व सेवा करामध्ये (जीएसटी) करमणूक कराचा समावेश होणार असल्याने या विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.महसूल विभागाच्या वतीने करमणूक, गौण खनिज, जमीन महसूल आदी कर वसूल केले जातात. पुणे विभागात एकट्या करमणूक कर विभागाकडून दर वर्षी सुमारे २०० ते २५० कोटींची कर वसुली केली जाते. विभागाच्या वतीने प्रामुख्याने चित्रपटगृहे, व्हिडीओ सिनेमा, केबल, डीटीएच, व्हिडीओ गेम, वॉटर पार्क आदी विविध माध्यमांतून महसूल जमा केला जातो. पुणे विभागात उपायुक्त, तहसीलदार, नायब तहसीलदार, अव्वल कारकून लिपिक अशी सुमारे १०६ अधिकारी, कर्मचारी सध्या कार्यरत आहेत. करमणूक कराऐवजी सेवा कर आकारला जाणार आहे.
गौण खनिज विभाग होणार सक्षम-जीएसीटीमुळे करमणूक कर विभाग बंद होणार असल्याने तेथील कर्मचारी प्रामुख्याने गौण खनिज विभागाकडे वर्ग करण्याचा प्रस्ताव विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी शासनाला पाठविला आहे. करमणूक कर विभागाच्या दुप्पट म्हणजे वर्षांला ४०० ते ४३० कोटी रुपयांचा महसूल मिळवून देणाऱ्या गौण खनिज विभागात सध्या कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. करमणूक कर विभागाकडे १०६ तर गौण खनिज विभागाकडे केवळ ७९ पदे आहेत. तर अन्य ३४ अव्वल कारकूनांच्या बदल्यात किमान ३६ नवीन पदे मंजूर करावीत, असा देखील प्रस्ताव दिला आहे. महसूल परिषदेमध्ये देखील त्यावर चर्चा झाली आहे.