नाशिक/जळगाव/अहमदनगर : मराठवाड्यासह सांगलीत शनिवारी गारपीट झाल्यानंतर रविवारी उत्तर महाराष्ट्राला गारपिटीसह अवकाळीने तडाखा दिला. गारांसह झालेल्या पावसाने नाशिक जिल्ह्यात कांदा, डाळिंब, टोमॅटोसह अन्य पिकांचे नुकसान झाले. नगर जिल्ह्यात फळबागांना फटका बसला तर जळगाव, धुळे व नंदुरबारमध्ये पावसाने पपई, केळी, कांदा, बाजरी पिकाचे नुकसान झाले.रविवारी दुपारी बारा वाजेपासूनच उत्तर महाराष्ट्रात ढगाळ वातावरण होते. दुपारी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, बागलाण, निफाड, देवळा तालुक्याला गारांच्या पावसाने झोडपले. शेतात नुकताच काढलेला कांदा पावसात भिजल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचले आहे. सुपारीच्या आकाराची गार असल्यामुळे डाळिंब, कांदा, मिरची पिकांना फटका बसला. नगर जिल्ह्यात संगमनेर, अकोले, राहुरी, श्रीगोंदा व नगर तालुक्यांत अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे कांदा उत्पादक व फळबागधारकांचे नुकसान झाले. खान्देशात नंदुरबार, धुळे, जळगाव जिल्ह्यात काही भागात रविवारी गारा आणि अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे काढणीवर आलेल्या उन्हाळी कांदा पिकाचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जळगाव जिल्ह्यात यावल आणि मुक्ताईनगर तालुक्यात जोरदार वादळामुळे केळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)अमरावतीत तुरळक पाऊस : अमरावती जिल्ह्यात मागील २४ तासांत अनेक ठिकाणी तुरळक पाऊस पडला. काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी बरसल्या. औरंगाबादला गारा बरसल्या : औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड शहर व परिसरात रविवारी सायंकाळी अचानक वादळी वाऱ्यासह दीड तास मध्यम व हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. १५ मिनिटे गाराही पडल्या.
गारपिटीसह अवकाळी पावसाने झोडपले
By admin | Published: May 01, 2017 4:08 AM