ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. 29 - लातूर शहरासह जिल्हाभरात शनिवारी दुपारनंतर सुरू झालेल्या वादळी वा-यासहीत झालेल्या पावसामुळे शेतक-यांसह ग्रामीण भागातील नागरिकांची धांदल उडाली. दरम्यान, चाकूर, जळकोट आणि जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये शेतक-यांनी विक्रीसाठी आणलेली हजारो क्विंटल तूर या पावसामुळे भिजली. गेल्या अनेक दिवसांपासून बाजार समितीच्या आवारात मापाविना पडून आहे. परिणामी, शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे.
लातूर शहरासह जिल्ह्यातील रेणापूर, पानगाव, खरोळा नळेगाव, चाकूर, अहमदपूर, शिरूर ताजबंद, हडोळती, किनगाव, कोपरा, उदगीर, हाळी हंडरगुळी, वाढवणा, नळगीर, देवर्जन, देवणी, वलांडी, धनेगाव, जळकोट, नळगीर, घोणसी, निलंगा, औराद शहाजानी, औसा, किल्लारी, उजनी, भादा, आलमला, लामजना, शिरूर अनंतपाळ, साकोळ, येरोळ, कबनसांगवी, उजळंब, नळेगाव, मुरूड आदी परिसरात शनिवारी दुपारी अचानक वादळी वा-यासह गारांचा पाऊस झाला.
या पावसामुळे ग्रामीण भागात आंबे आणि द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे़ तर चाकूर, जळकोट, लातूर, औसा, औराद शहाजानी आदी ठिकाणच्या बाजार समितीत विक्रीसाठी आलेली हजारो क्विंटल तूर भिजली आहे़
चाकूर, जळकोट बाजार समितीत गेल्या पंधरा दिवसांपासून ही तूर उघड्यावर पडून आहे. त्यामुळे आर्थिक कोडींत अडकलेल्या शेतक-याला शनिवारच्या अवकाळी पावसाचा अधिक फटका बसला आहे. यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे.