मुंबई : गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अकार्यक्षमता आणि पोलिसच गुन्हेगारीला संरक्षण देत असल्याने राज्यात गुन्हेगारी बोकाळली असून सरकारचे अस्तित्वच जाणवत नसल्याने कायदा-सुव्यवस्थेचा धाक संपला आहे, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केली.विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना पवार म्हणाले की, २५ हजारांच्या हप्त्यासाठी पोलिसांनी मालवणीतील दारूकांडाच्या आरोपींना संरक्षण दिले होते. अशा अधिकाऱ्यांविरुद्ध खुनाचाच गुन्हा दाखल केला पाहिजे. अमली पदार्थांच्या माफिया महिलेशी थेट पोलिसांचे संबंध उघड झाले आहे. आम्ही सत्तेत होतो तेव्हा कायदा-सुव्यवस्थेवरून एकनाथ खडसे आमची लाज काढायचे, आता आम्ही कोणाची लाज काढायची असा बोचरा सवाल पवार यांनी केला. कॉ.गोविंद पानसरे यांचे मारेकरी सापडलेले आहेत पण सरकार माहिती दडवित असल्याचा आरोप होत आहे याकडे लक्ष वेधून अजित पवार म्हणाले की, या हत्येचे धागेदोरे कोणापर्यंत पोहोचले आहेत याचे उत्तर सरकारने दिले पाहिजे. आम्ही वारंवार मागणी करूनही आमचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना पोलीस संरक्षण का दिले जात नाही, पानसरे, दाभोलकरांसारखे त्यांचेही बरेवाईट व्हावे, असे तुम्हाला वाटते का, असा सवाल त्यांनी केला. (विशेष प्रतिनिधी)मुख्यमंत्री तटकळलेआषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये पांडुरंगाची पूजा करायला मुख्यमंत्री सपत्नीक गेले तेव्हा त्यांच्या आधी सोलापूरचे कलेक्टर सपत्नीक पूजा करीत असल्याने मुख्यमंत्र्यांना सपत्नीक २० मिनिटे बाहेर ताटकळावे लागले, कलेक्टर पूजा करताहेत तोवर कासवाची पूजा करा, असे मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आल्याचा गौप्यस्फोट अजित पवार यांनी यावेळी केला. ज्येष्ठ मंत्री एकनाथ खडसे त्यावेळी तेथे होते. हा प्रकार पाहून ते इतके संतप्त झाले की तेथून निघून गेले. शेवटी भाऊसाहेब फुंडकरांनी त्यांना मन वळवूनआणले, अशी माहिती देऊन पवार म्हणाले की कलेक्टरनी १२ कोटी जनतेचा अपमान केला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या अकार्यक्षमतेमुळे राज्यातील गुन्हेगारी ‘बोकाळली’
By admin | Published: July 31, 2015 2:26 AM