नाशिक : महावितरणकडून ग्राहकांना अचूक वीज बिल देण्यात यावे यासाठी वीजमीटर रीडिंगप्रणालीत बदलही करण्यात आले आहेत. मात्र अजूनही रीडिंगमधील दोष समोर येतच असून ते सुधारण्यासाठी महावितरणला ३७३ कोटींचा भुर्दंड सोसावा लागला आहे.
महवितरणने अचूक वीज बिलांसाठी अनेक बदल केले आहेत. मात्र त्यामुळे अपेक्षित परिणाम साधलेला नसल्याचे महावितरणच्याच मासिक पत्रकातून समोर आले आहे. चुकीचे वीजबिल दुरुस्त करून देताना महावितरणला तब्बल ३७३ कोटींचा भुर्दंड सहन करावा लागलेला आहे. यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे आर्थिक नुकसान सोसावे लागल्यानंतर अधिकाऱ्यांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार चुकीचे मीटर रीडिंग घेण्यात आलेल्या ग्राहकांच्या बिलांची दुरुस्ती करण्याबाबतही काही ठिकाणी अतिशय गंभीर चुका झाल्याचे महावितरणच्या निदर्शनास आले आहे.
२०१८-१९ या आर्थिक वर्षात घरगुती, वाणिज्यक व औद्योगिक लघुदाब वर्गवारीतील ग्राहकांकडून वीजबिलापोटी २७ हजार २४७ कोटी रुपये महसूल येणे अपेक्षित असताना केवळ ग्राहकांचे चुकीचे वीजबिल दुरुस्त करून देताना महावितरणला ३७३ कोटींचा नाहक भुर्दंड सहन करावा लागला आहे. शाखा कार्यालयापासून ते विभागीय कार्यालयांची थकबाकी कमी व्हावी यासाठी ग्राहकांच्या वीजबिलांचे पुनरावलोकन करून कमी केले जाते. सध्या केंद्रीय पद्धतीने बिलिंग सुरू केले असल्याने पुनरावलोकन करण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी ते समाधानकारक नसल्याची बाब व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार यांनी अधोरेखित केली आहे.मुळात अचूक रीडिंग घेऊन ग्राहकाला वीजबिल पाठविणे ही महावितरणची जबाबदारी आहे. परंतु ग्राहकांना बोगस बिले पाठविली जात असल्याची ही वस्तुस्थिती समोर आली आहे. गळती आणि चोरी लपविण्यासाठी शेतकऱ्यांना सरासरी युनिटचे वीजबिल दिले जाते. ठेकदार घरी बसून वीजबिले तयार करतात याचा फटका नक्कीच बसणार.- प्रताप होगाडे, अध्यक्ष, महाराष्टÑ वीज ग्राहक संघटना