मुंबई : राज्यात तुरीच्या उत्पादनात वाढ झाल्याने नाफेडमार्फत तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली. खरीप-२०१६मध्ये तुरीचे उत्पन्न वाढण्यासाठी राज्य शासनामार्फत प्रयत्न करण्यात आले आहेत. पर्जन्याधारित शेती क्षेत्रामध्ये तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. राज्य शासनाने तूर लागवडीला दिलेल्या प्रोत्साहनामुळे या वर्षी दरवर्षीपेक्षा सुमारे २३ टक्केपेक्षा जास्त क्षेत्रावर तुरीची लागवड झाली आहे. त्यामुळे उत्पादनात ४७ टक्क्यांनी वाढ होणार असल्याचा अंदाज आहे. या वर्षी १२.५० लाख मेट्रीक टन तूर उत्पादन होणार असून, किमान आधारभूत किंमत मिळावी यासाठी नाफेडमार्फत तूर खरेदी करण्याची मागणी केली आहे, असे फुंडकर यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)कमवा व शिका योजना : इस्रायलच्या सहकार्याने राज्यात कमवा व शिका योजना सुरू करून विद्यार्थ्यांना कृषी शिक्षण देण्याबाबतची योजना आखण्यात येत असल्याची माहिती फुंडकर यांनी दिली. मंत्रालयात इस्रायलच्या शिष्टमंडळाने कृषिमंत्र्यांची भेट घेतली. इस्रायलकडे उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करून विदर्भामध्ये सीताफळ संशोधन प्रशिक्षण कार्याला गती द्यावी, असेही फुंडकर यांनी सांगितले. या वेळी इस्रायलचे कौन्सुलेट जनरल डेव्हिड अकोव्ह, गिलाड कोहेल उपस्थित होते.
उत्पादनवाढीमुळे नाफेडमार्फत तूर खरेदी करणार
By admin | Published: December 24, 2016 3:58 AM