जयंत धुळप / अलिबागनवी मुंबईच्या बाजारात दरवर्षी सर्वप्रथम हापूस आंबा पाठविणाऱ्या अलिबाग तालुक्यातील खारेपाट भुवनेश्वर परिसरात यंदा वाढलेल्या तापमानामुळे फळधारणाच मुळात कमी झाल्याने हापूस आंब्याच्या उत्पादनात ३० ते ४० टक्क्यांनी घट झाली असल्याची माहिती आंबा बागायतदार डॉ. जगन्नाथ पाटील यांनी दिली आहे.खारेपाट भुवनेश्वर परिसरातून दरवर्षी दररोज सुमारे दोन हजार टन हापूस आंबा नवी मुंबई बाजारामध्ये जात होता. या वर्षी चांगला मोहोर आला. परंतु, फेब्रुवारीत अचानक वाढलेल्या तापमानामुळे तो गळून फळधारणा अत्यंत कमी झाली आहे. दरवर्षीची परंपरा अबाधित राखून अलिबागच्या खारेपाटातील काही शेतकऱ्यांचा आंबा फेब्रुवारी महिन्यापासूनच नवी मुंबईच्या बाजारपेठेत जाऊ लागला आहे. परंतु, शेवटच्या मोहोराला फळ कमी झाल्यामुळे मे महिन्यात आंब्याचा तुटवडा भासणार, अशी शक्यता आंबा बागायतदार डॉ. पाटील व मारुती मास्तर यांनी व्यक्त केली. शासनाने आंबा बागायतदार व भाजीपाला उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष द्यावे. उत्पादन खर्चाचा विचार करून शेतकऱ्यांना हमी भाव द्यावा. कारण, हमी भाव मिळत नाही तेव्हा शेतकऱ्यांना उत्पादित माल रस्त्यावर टाकण्याची वेळ येते. त्यामुळेच शासनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी मारुती मास्तर यांनी केली.
वाढलेल्या तापमानामुळे हापूस आंब्याचे उत्पादन घटले
By admin | Published: March 25, 2017 2:22 AM