- विवेक चांदूरकर, वाशिम
मुलीच्या गैरकृत्याबद्दल जातपंचायतीने समाजातून बहिष्कृत करून, ५ लाखांचा दंड ठोठावल्याचा धक्का सहन न होऊन एका ग्रामस्थाचा हृदयविकाराने मृत्यू झाला. जातपंचायतीच्या आदेशामुळे या दुर्दैवी पित्याच्या अंतिम संस्कारासही कुणी गेले नाही, हे विशेष.रिसोड तालुक्यात गणेशपूर हे एक छोटेसे गाव असून, येथे नाथ जोगी समाजाचे लोक आहेत. सुभाष सावंत यांच्या मुलीचा विवाह गावातीलच साईनाथ शितोडे याच्यासोबत तीन वर्षांपूर्वी झाला. लग्नानंतर दोन वर्षे तिला अपत्य झाले नाही. त्यामुळे संसारात कुरबुर सुरू होती. त्यानंतर पत्नी गरोदर राहिली; मात्र पतीने हा गर्भ आपला नसल्याचा संशय घेऊन तिला माहेरी पाठविले. यानंतर त्याने या प्रकाराची तक्रार मालेगाव तालुक्यातील कोल्ही येथील जातपंचायतीचे प्रमुख बापू चिमाजी सेगर यांच्याकडे केली. या तक्रारीवर निर्णय घेण्यासाठी २८ आॅक्टोबर रोजी पंचायत बोलविण्यात आली. सुभाष सावंत यांच्या मुलीने गर्भपात करून घ्यावा, असा निर्णय या वेळी पंचांनी दिला. तद्वतच, सावंत यांना समाजातून बहिष्कृत करण्याचा निर्णयही या वेळी पंचांनी घेतला व ५ लाख रुपयांचा दंड भरावा, असे फर्मान पंचांनी सोडले. बहिष्कृत करण्यात आल्याचे शल्य सुभाष यांच्या मनाला बोचले. दंडासाठी पैसे कुठून आणावेत, हा प्रश्न त्यांना पडला. या विवंचनेत ६ नोव्हेंबर रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला. जातपंचायतीने समाजातून बहिष्कृत केले आहे. पोलीस दखल घेण्यास तयार नाहीत. तक्रार दिल्यावरही कारवाई झाली नाही. आता जातीबाहेर कसे वास्तव्य करावे, मुलांचे विवाह कसे करावेत, पंचायतीतील लोक सुखाने जगू देणार नाहीत, अशी भीती सुभाष यांच्या आई-वडिलांना असून, अशा स्थितीत आमच्यापुढे आता आत्महत्येशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले.