ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 09 - वेळेत रक्त न मिळाल्याने पाच दिवसाच्या बाळाचा गुरुवारी (दि.५) दुर्दैवी मृत्यू झाला. संतप्त नातेवाईकांनी चोवीस तास अविरत सेवा देणा-या शहरातील दोन ब्लड बँकांच्या निष्क्रियतेमुळे बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत त्यांच्यावर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन कुटुंबियांनी सोमवारी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांना दिले.
सानेगुरुजी वसाहत येथील शिवगंगा कॉलनीत राहणा-या नवीन कारेकर व श्रद्धा कारेकर या दाम्पत्याला सोमवारी (दि. २) पंचगंगा रुग्णालयात मुलगा झाला. त्याचे वजन सात पौंड होते. तिस-या दिवशी बाळाची प्रकृती बिघडली. सर्वप्रकारच्या तपासण्या केल्यानंतर त्याला कावीळ झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी कदमवाडी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. बालरोग तज्ज्ञांनी बालकाला तत्काळ रक्त चढवायचे असल्याने रक्ताची व्यवस्था करण्यास सांगितले. कारेकर कुटुंबीयांनी गुरुवारी (दि. ५) दिवसभर शहरातील सर्वच ब्लड बँकांमध्ये ‘ओ निगेटिव्ह ब्लड’ची चौकशी केली; मात्र कुठेच ब्लड उपलब्ध झाले नाही. त्यानंतर नीलेश औटी, प्रशांत कारेकर, शैलेश टाकळीकर यांनी रक्त मिळविण्यासाठी व्हॉटस् अॅप ग्रृपवर मेसेज टाकला. त्याला २५ ते ३० तरुणांनी प्रतिसाद दिला; परंतु ब्लड बॅकेतील कर्मचा-यांनी रात्रीची वेळ आहे. त्यामुळे रक्त घेता येणार नाही, असे सांगितले. त्यामुळे पहाटे रक्तदात्यांकडून रक्त घेतले. त्यावर प्रक्रिया करणारे महिला तज्ज्ञ उशिरा आल्या. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत खूपच उशीर झाला होता. रक्त वेळेत न मिळाल्याने बालकाचा मृत्यू झाला. २४ तास सेवा देण्याचे आश्वासन देणा-या शहरातील ब्लड बँकांचे काम रात्री १० नंतर बंद असते. आपल्यावर जी दुर्दैवी वेळ आली ती दुस-यावर येऊ नये, यासाठी कारेकर कुटुंबीयांनी जिल्हाधिका-यांना निवेदन दिले. त्यामध्ये संबंधित ब्लड बँकांची माहिती घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.