ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 29 - उधारीवर सिगारेट देण्यास नकार देणाऱ्या दुकानदाराच्या डोक्यावर हातोड्याने वार करून त्यांचा खून करणाऱ्या 20 वर्षांच्या तरुणास सत्र न्यायाधीश यू. एल. तेलगावकर यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. तसेच हतोड्याने वार करुन त्यांना गंभीर जखमी केल्याबद्दल सुद्धा न्यायालयाने आरोपीला एक वर्ष सश्रम कारावास आणि एकुण १५०० रुपये दंड ठोठावला. फिर्यादी जगन्नाथ एकनाथ येवले (६६) यांचे कन्नड येथे किराणाचा दुकान आहे. १५ मार्च २०१४ रोजी त्यांचा मुलगा उमेश (३१) हा दुकानात असताना आरोपी सतीश सुरेश श्रीसुंदर व त्याचा अल्पवयीन छोटा भाऊ दुकानात गेले. सतीशने उमेशला उधारीवर सिगारेट मागीतली. मात्र, उमेशने उधारीवर देण्यास नकार दिला. म्हणुन सतीश व त्याच्या भावाने उमेशसोबत वाद घातला नंतर ते तेथून निघून गेले. थोड्या वेळाने ते दोघे परत उमेशच्या दुकानावर आले. त्यावेळी सतीशच्या हातात हतोडा होता. त्यांनी पुन्हा उमेशसोबत भांडण केले. सतीशने उमेशच्या डोक्यावर हातोड्याने वार करुन त्यांना गंभीर जखमी केले. उमेशचे वडील जगन्नाथ, आई मंगलबाई, भाऊ संदिप आदी भांडण सोडविण्यास आले असता सतीश व त्याचा भाऊ पळुन गेले. उमेशला सुरुवातीस कन्नड येथील खाजगी दवाखान्यात प्रथमोपचारानंतर घाटी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. उपचार चालु असताना २६ मार्च २०१४ रोजी उमेशचे निधन झाले. उमेशचे वडील जगन्नाथ यांच्या फिर्यादीवरुन सतीशविरुद्ध कन्नड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन पोेलिस उपनिरीक्षक सिद्दीकी यांनी सतीशला अटक करुन गुन्ह्याचा तपास केला व न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. अटकेपासून खटल्याच्या निकालापर्यंत सतिश तुरुंगातच आहे. खटल्याच्या सुनावणीच्या वेळी सहायक सरकारी वकील सुदेश शिरसाठ यांनी एकुण ९ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. त्यांच्यापैकी उमेशचे वडील जगन्नाथ, आई मंगलबाई, भाऊ संदिप आणि डॉक्टरांचा जबाब महत्वाचा ठरला. सुनावणीअंती आरोप सिद्ध झाल्यामुळे न्यायालयाने आरोपी सतीशला खुनाच्या आरोपाखाली भा.दं.वि. कलम ३०२ अन्वये जन्मठेपेची शिक्षा आणि एक हजार रुपये दंड ठोठावला. तसेच बोथड हत्याराने पारहाण करुन गंभीर जखमी केल्याच्या आरोपाखाली भा.दं.वि. कलम ३२३ अन्वये एक वर्ष सश्रम कारावास आणि ५०० रुपये दंड ठोठावला. या प्रकरणात सहायक सरकारी वकील सुदेश शिरसाठ यांना पैरवीकार अधिकारी जमादार सुरेश साळवे आणि सहाय्यक फौजदार ए.एस. जावळे यांनी सहकार्य केले.
उधारीवर सिगारेट न दिल्यामुळे दुकानदाराचा खून करणाऱ्यास जन्मठेप
By admin | Published: December 29, 2016 8:41 PM