हडपसर : सोलापूर रस्त्यावर महादेवनगर चौकात सतत वाहतूककोंडी होत असल्यामुळे ध्वनिप्रदूषण आणि वायूप्रदूषणामुळे स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत. या चौकातून महादेवनगर, मांजरीमार्गे वाघोलीकडे जाणाऱ्या वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे या चौकात सिग्नल बसवून सकाळी आणि सायंकाळी वाहतूक पोलीस नियुक्त करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.पालिकेने सोलापूर रस्त्याचे लक्ष्मी कॉलनीपर्यंत रुंदीकरण करून स्ट्रीट लाइट आणि सीसीटीव्ही कॅमेरेही बसविले आहेत. तरी मांजरी फाटा चौकात सिग्नल बसविण्यासाठी महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम खाते एकमेकांवर ढकलत आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्यानेही रस्तारुंदीकरणासाठी परवानगी दिल्यानंतरच रुंदीकरण केले असेल ना, मग सिग्नल बसविण्यासाठी आडकाठी का घेतली जात आहे, अशी विचारणा नागरिकांकडून केली जात आहे.चौकातून जाणारा रस्ता अतिक्रमणामुळे अरुंद झाला आहे. त्यामुळे या चौकात सतत वाहतूककोंडी होत असते. गेल्या महिन्यापूर्वी दुपारी अडीचच्या सुमारास बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने बस टपरीमध्ये घुसली होती. अशा प्रकारच्या घटना वारंवार होत आहेत. या चौकाच्या बाजूलाच भाजीविक्रेते आणि खाद्यपदार्थांच्या गाड्याही लागलेल्या असतात. त्यामुळे हा परिसर कायमस्वरूपी अपघातसदृश झाला आहे, असे नागरिकांनी सांगितले.अण्णासाहेब मगर महाविद्यालय आणि इंजिनिअरिंग कॉलेज, खासगी आणि जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थीही याच चौकातून ये-जा करीत असतात. मांजरी-महादेवनगर परिसर महापालिकेलगत असल्याने नागरीकरण झपाट्याने वाढले आहे. सोलापूर मार्गावरून आलेली अनेक वाहने मांजरीमार्गे वाघोलीकडे जात असतात. त्यामुळे हा रस्ता सतत वर्दळीचा झाला आहे. मोठी वाहने या चौकातून मांजरीकडे वळाली की, पुण्याकडून सोलापूरकडे जाणारी वाहतूक ठप्प होते आणि दूरपर्यंत रांगा लागतात. मांजरी फाटा चौकातील अतिक्रमणे हटवून रस्ता रुंद करावा, अशी मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.(वार्ताहर)>हद्दीच्या वादात काम रखडलेया चौकात पीएमपीचा बसथांबा आहे. मात्र, बसशेड नसल्यामुळे अनेक विद्यार्थी रस्त्यावरच बसची वाट पाहत असतात. पुण्याकडून येणाऱ्या भरधाव वाहनांमुळे बसची वाट पाहणाऱ्यांना धोका होऊ शकतो. या चौकात गतिरोधक आणि सिग्नल तातडीने बसविण्याची गरज आहे.- प्रकाश पाटील, स्थानिक नागरिकचौकात सिग्नल बसविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खाते आणि महापालिकेकडे वांरवार लेखी पाठपुरावा केला आहे. मात्र, हद्दीचा वाद दाखवून या ठिकाणी सिग्नल बसविला जात नाही. त्यामुळे वाहतूककोंडी होत असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.- सुनील शेळके, सहायक पोलीस निरीक्षकअतिक्रमणामुळे चौकात रस्ता अरुंद झाला असून, सतत वाहतूककोंडी होत असते. शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांबरोबर ज्येष्ठ नागरिकांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत आहे. वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.- राजेश माने, स्थानिक नागरिक
सिग्नल नसल्याने वाहतूक कोंडी
By admin | Published: September 19, 2016 1:34 AM