ठाणे : ठाणे पालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून शिवसेना आणि भाजपामध्ये इनकमिंगचे वारे वाहू लागले आहेत. त्याचवेळी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला गळती लागली आहे. राष्ट्रवादीचे चार नगरसेवक इतर पक्षात जाऊन स्थिरावले आहेत. राष्ट्रवादीने हे फारसे मनावर घेतले नसले तरी एमआयएमने ओवेसी यांची दणदणीत सभा घेऊन मुंब्य्रात शिरकाव केल्याने राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा मानली जाते आहे. स्थानिक पातळीवर एमआयएमची संघटनात्मक बांधणी पुरेशी नाही, पक्षाचे पुरेसे बस्तान बसलेले नाही, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रसेच्या नेत्यांनी पालिका निवडणुकीत एमआयएमचा फारसा प्रभाव जाणवणार नसल्याचा दावा केला आहे. मात्र यापूर्वी ज्या ज्या ठिकाणी एमआयएमने लढत दिली आहे, तेथे कॉंग्रेस, राष्ट्रवादीलाच अधिक धक्का बसला आहे आणि शिवसेना, भाजपाचा फायदा झाला आहे. त्यामुळे मुंब्य्रात एमआयएम कितपत चालेल, यापेक्षाही त्यांच्यामुळे बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला किती धक्का बसेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. ठाणे महापालिकेच्या प्रभाग रचनेत काही ठिकाणच्या जागा सत्ताधाऱ्यांना फायदेशीर ठरणार आहेत. कल्याण-डोंबिवलीप्रमाणेच ठाण्यातही खरी लढत ही आता शिवसेना-भाजपामध्येच होणार असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. त्यामुळे हे दोन्ही पक्ष ताकद वाढवण्यासाठी खऱ्या अर्थाने कामाला लागले आहेत. त्याचवेळी राष्ट्रवादीने कळवा, मुंब्रा, राबोडी आदी भागांवर लक्ष केंद्रीत करुन मागील निवडणुकीइतक्या जागा कशा येतील, त्याचे गणित आखले आहे. त्यानुसार त्यांनी या भागांवर लक्ष केंद्रीत करुन मोर्चेबांधणी सुरु केली आहे. यंदा कळव्यातून १६ आणि मुंब्य्रातून २० नगरसेवक पालिकेवर निवडून जाणार आहेत. सध्या कळव्यात आणि मुंब्य्रात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा आकडा चढा आहे. त्यावरच राष्ट्रवादीच्या अस्तित्वाची मदार आहे. त्यांची हीच सोपी गणिते बिघडविण्यासाठी मुंब्य्रात एमआयएमने दमदार प्रवेश केला आहे. (प्रतिनिधी)>राष्ट्रवादीतील बंडखोरांवर नजरनिवडणुका जाहीर होण्यापूर्वीच राष्ट्रवादीला इतर पक्षांनी धक्का दिला असून चार नगरसेवकांनी शिवसेना आणि भाजपामध्ये प्रवेश केला आहे. हे चारही नगरसेवक पूर्वीपासूनच आमचे नव्हते, असा दावा जरी राष्ट्रवादीची मंडळी करत असली तरी त्यांच्या नाराजांच्या फळीतील नेमके कोण एमआयएमच्या तंबूत जाणार हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.>ध्रुवीकरण सेनेच्या पथ्यावर?एमआयएमचा फायदा भाजपाला होतो. प्रसंगी मतांचे ध्रुवीकरण शिवसेनेच्याही पथ्यावर पडते. त्यामुळे आताही त्यांनीच मागल्या दाराने एमआयएमला मैदानात उतरविल्याची चर्चा आहे. एमआयएम मुंब्रा आणि राबोडीत उमेदवार उभे करणार असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला याची दखल घ्यावी लागणार आहे. एमआयएमचे किती उमेदवार निवडून येतील याचा अंदाज बांधणे कठीण असले तरी ते कोणाकोणाची गणिते बिघडवतात हे पाहणे महत्वाचे आहे.
एमआयएममुळे राष्ट्रवादी धास्तावली
By admin | Published: November 05, 2016 3:36 AM