मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या पेपरफुटीला आळा घालण्यासाठी परीक्षा विभागाने नवीन तांत्रिक पद्धतीचा अवलंब केला आहे. या पद्धतीमुळे पेपर कोणत्या परीक्षा केंद्रावरून फुटला याची माहितीही उपलब्ध होणार आहे. ही पद्धत सोमवारी होणार्या इंजिनीअरिंगच्या पेपरसाठी वापरण्यात येणार आहे. अग्रवाल महाविद्यालयात एमएचआरएम परीक्षेचा पेपर फुटल्याचे प्रकरण समोर आले होते. याची दखल घेत विद्यापीठाने पेपर पाठविण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठामार्फत घेण्यात येणार्या परीक्षांचे पेपर डिजिटल एक्झाम पेपर डिलिव्हरी (डीईपीडी) पद्धतीद्वारे परीक्षा केंद्रांना पाठवितात. परीक्षेच्या काही वेळापूर्वी विद्यापीठाकडून परीक्षा केंद्रांना पेपरची लिंक मेल करण्यात येते. यावरून परीक्षा केंद्रावर पेपरची प्रिंट घेण्यात येते. मात्र, एखाद्या केंद्रावर पेपर फुटण्याची शक्यता असते. हे प्रकार रोखण्यासाठी विद्यापीठाने परीक्षा केंद्रांना पेपर पाठविण्यासाठी डीईपीडीएस ही नवी पद्धत सुरू केली आहे. नवीन पद्धतीनुसार परीक्षा केंद्रांना विद्यापीठाच्या वेबसाईटवरून सॉफ्टवेअर डाऊनलोड करावे लागणार आहे. हे सॉफ्टवेअर डाऊनलोड केल्यानंतर प्रिंट घेताना प्रिंटवर वॉटर मार्क येणार आहे. या वॉटर मार्कवर महाविद्यालयाचे नाव येणार आहे. यामुळे ही प्रिंट कोणाकडे मिळाल्यास पेपर संबंधित महाविद्यालयातूनच फुटल्याचे स्पष्ट होणार आहे. याची चाचणी शनिवारी घेण्यात आली. यानंतर सोमवारी होणार्या इंजिनीअरिंगच्या पेपरसाठी ही पद्धत सुरू होणार आहे. (प्रतिनिधी)
नव्या तंत्रामुळे पेपरफुटीला आळा
By admin | Published: May 19, 2014 3:15 AM