खामगाव (बुलडाणा): नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन शेतकर्यांनी गुरूवारी आत्महत्या केली. एका शेतकर्याने विष प्राशन करून, तर दुसर्याने गळफास घेऊन मृत्यूला कवटाळले. नांदुरा तालुक्यातील तांदुळवाडी येथील राजेश दिनकर जुनारे (वय ३0) यांनी ३0 जुलै रोजी रात्री ८ वाजता गुरांच्या गोठय़ात विषारी औषध प्राशन केले. त्यांना तातडीने बुलडाणा येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, भाऊ व एक मुलगी आहे. जुनारे यांच्यावर महाराष्ट्र बँक व बुलडाणा अर्बनचे ४५ हजार रुपये कर्ज असून सततच्या नापिकीमुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे मृतकाच्या नातेवाईकांनी सांगितले. दुसर्या घटनेत शेगाव तालुक्यातील माटरगाव येथील एका ४३ वर्षीय तरुण शेतकर्याने शेतात निंबाच्या झाडाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. माटरगाव-भास्तन रोडवरील शेतामध्ये गुरूवारी ही घटना घडली. भरत हरिभाऊ सपकाळ (वय ४३) हे मृताचे नाव आहे. नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून भावाच्या शेतात त्याने आत्महत्या केली. त्याच्या पश्चात पत्नी, १ मुलगा, १ मुलगी असा आप्त परिवार आहे. त्याच्याकडे अवघी २ एकर शेती असून, ती बुडीत क्षेत्रामध्ये असल्याने शासन दफ्तरी शेतीची नोंद होत नव्हती. पंचनामा करताना पोलिसांना मृताच्या खिशात चिठ्ठी सापडली. बँक ऑफ महाराष्ट्रचे १ लाख रुपये कर्ज अंगावर असल्याचा उल्लेख चिठ्ठीत केला आहे.
नापिकीमुळे दोन युवा शेतक-यांच्या आत्महत्या
By admin | Published: July 31, 2015 11:11 PM