सोनई (अहमदनगर) : शनिशिंगणापूर येथे शनिदेवाच्या चौथऱ्यावर दर्शनासाठी महिलांना प्रवेशबंदी असताना, शनिवारी एका तरुणीने शनिदेवाला तेल अर्पण केल्याची घटना घडली. रविवारी गावकऱ्यांनी गाव बंद ठेवून या घटनेचा निषेध नोंदवला, तसेच शनिदेवाला तेल व दुधाचा अभिषेक केल्यानंतर दर्शन व्यवस्था सुरळीत झाली.ढिसाळ सुरक्षा व्यवस्था व विश्वस्त मंडळाच्या मनमानीविरोधात, विश्वस्तांनी तत्काळ राजीनामे देण्याची मागणी गावकऱ्यांनी रविवारी सभेत केली. शनिशिंगणापूर येथे चारशे वर्षांपासून महिलांना चौथऱ्यावर जाण्यास मनाई आहे. मात्र, शनिवारी सायंकाळी पुणे येथील २०वर्षीय तरुणीने सुरक्षा कवच भेदून, थेट चौथऱ्यावर प्रवेश केला व शनिदेवाच्या मूर्तीला तेल अर्पण केले. कोणाला काही समजण्याच्या आतच ही तरुणी चौथऱ्यावरून खाली उतरली. तिला अटकाव करण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. एका विश्वस्ताने हा प्रकार रूढी व परंपरेला छेद देणारा असल्याचे सांगून, रात्री १० वाजता मंदिरात धाव घेतली. रविवारी सकाळी मंदिरात गावकऱ्यांनी निषेध सभा घेतली. कायदा-सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्या पथकाने रविवारी पोलीस संचलन केले. गावकऱ्यांनी सभेत देवस्थानच्या विश्वस्तांचा निषेध करत, त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. एका विश्वस्ताने धर्मादाय आयुक्तांकडे राजीनामा देण्याची तयारी दर्शविली आहे, तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्यांनी तरुणीने चौथऱ्यावर जाऊन घेतलेले दर्शन म्हणजे एक क्रांतिकारी पाऊल असून, आता रूढी-परंपरा बदलण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. घटनेबाबत तरुणी अनभिज्ञ असल्याने त्याचा बाऊ करू नये, अशी भावना भाविकांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)> सात कर्मचारी निलंबितघटनेप्रकरणी दोषी असणाऱ्या सात सुरक्षा कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे, असे देवस्थानचे अध्यक्ष प्रा. शिवाजी दरंदरे यांनी सांगितले.> समानतेचा अधिकार - तरुणीने पूजा करणे म्हणजे, तिला राज्यघटनेने मिळालेला समानतेचा अधिकारच आहे, परंतु महिलेने मंदिर प्रवेश केला, म्हणून ते पवित्र करणे किंवा या घटनेला सुरक्षा रक्षकाला जबाबदार धरून त्यांना निलंबित करणे, या दोन्ही घटना निषेधार्ह आहेत. अशा अंधश्रद्धाळू घटनेचा अंधश्रद्धा निर्मूलन समिती निषेध करते. - मुक्ता दाभोलकर, अंनिसच्या कार्यकर्त्या
तरुणीने दर्शन घेतल्याने शनीवर दुग्धाभिषेक
By admin | Published: November 30, 2015 3:27 AM