हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेनगरी (ठाणे) : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यावर सुरू असलेली कारवाई त्याचबरोबर ठाण्यातील बिल्डर सूरज परमार यांच्या आत्महत्याप्रकरणात पोलिसांनी लक्ष्य केलेले आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या दबावामुळे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी नाट्यसंमेलनाच्या समारोप सोहळ्याला पाठ दाखवली, अशी चर्चा आहे. भुजबळ यांचे पुतणे समीर यांना ईडीने अटक केली आहे. पुत्र पंकज यांची तासन्तास चौकशी सुरू आहे. खुद्द भुजबळ हेही चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची भीती आहे. त्याचबरोबर परमार आत्महत्या प्रकरणात नगरसेवक नजीब मुल्ला यांच्या जामिनाला विरोध करताना पोलिसांनी आव्हाड यांचेही नाव या प्रकरणात घेतले. एकीकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांना भाजपा सरकार व गृह खाते सांभाळणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लक्ष्य करीत असताना पवार यांनी त्यांच्यासोबत व्यासपीठावर बसून सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घ्यावा, हे या नेत्यांचे व समर्थकांचे मनोबल खच्ची करणारे असल्याने पवार यांनी या कार्यक्रमाला जाऊ नये, याकरिता भुजबळ व आव्हाड या दोन्ही नेत्यांनी दबाव टाकल्याचे बोलले जाते. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे हेही समारोपाच्या कार्यक्रमास हजर न राहता त्यापूर्वी पार पडलेल्या खुल्या अधिवेशनाच्या कार्यक्रमात तोंड दाखवून गेले. सांस्कृतिक खाते आपल्याकडे असूनही रंगकर्मींचा ओढा हा मुख्यमंत्र्यांकडेच असेल, हे नेमके हेरून तावडे यांनी फडणवीस तेथे पोहोचण्यापूर्वीच काढता पाय घेतला. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही संमेलनास हजर राहण्याचे टाळले. मुनगंटीवारांची अनुपस्थिती व निधी उपलब्ध न होणे यांचा परस्परसंबंध असल्याचा एक अप्रत्यक्ष संकेत शिंदे यांनी दिला. (प्रतिनिधी)मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या भाषणात संमेलनाचे प्रमुख वैशिष्ट्य सांगताना या संमेलनात कोणताही वाद झाला नाही, त्यामुळे हे संमेलन वेगळे ठरले, असे स्पष्ट केले. मात्र, उपरोक्त राजकीय नाट्यामुळे अखेरच्या क्षणी वादाची किनार लाभलीच.
भुजबळ, आव्हाड यांच्या दबावामुळे पवारांची दांडी
By admin | Published: February 22, 2016 2:34 AM