साहित्य महामंडळाने भाषणाच्या १ हजार प्रती छापल्याने श्रीपाल सबनीसांचे उपोषण मागे
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २७ - अध्यक्षीय भाषण न छापल्याने संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस आणि साहित्य महामंडळ यांच्यादरम्यान गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला वाद अखेर मिटला असून महामंडळाने सबनीसांच्या अध्यक्षीय भाषणाच्या १ हजार प्रती छापल्या आहेत. त्यामुळे श्रीपाल सबनीस यांनी त्यांचे उपोषण मागे घेतले आहे. मंडलाने २५ प्रती लगेचच सबनीस यांच्या घरी पाठवल्या.
साहित्य महामंडळाने अध्यक्षीय भाषण न छापून राज्यघटनेचा अवमान केल्याचे सबनीस म्हणाले होते. भाषणाचे मुद्दे चौकटीत बसत नाहीत म्हणूनच महामंडळाने ते भाषण जाणीवपूर्वक छापले नसल्याचा पुनरूच्चार करत २६ जानेवारीपर्यंत भाषण छापले नाही तर २७ जानेवारीला महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या बाहेर सपत्नीक लाक्षणिक उपोषणाला बसणार असल्याचा इशारा सबनीस यांनी गेल्या आठवड्यात दिला होता. संमेलनाच्या इतिहासात यंदा प्रथमच संमेलनाध्यक्षांचे भाषण महामंडळाकडून छापले गेले नसल्याने ते वाचकांना वाचण्यासाठी उपलब्ध होऊ शकले नाही. अशा पद्धतीने असहिष्णुतेने वागण्याची ठेकेदारी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना दिली कोणी? महामंडळ सेन्सॉर बोर्डासारखे कधीपासून वागायला लागले, असे प्रश्न विचारत सबनीस यांनी स्वत: पुढाकार घेऊन स्वखर्चाने भाषण छापून घेतले होते.
मात्र अखेर काल ( मंगळवार) साहित्य महामंडळाने नमते घेत सबनीस यांच्या भाषणाच्या हजार प्रती छापल्या. त्यानंतर सबनीस यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय जाहीर करत महामंडळाचे आभारही मानले. आज साहित्य महामंडळ, सह्याद्री आणि साहित्यवेध प्रतिष्ठान या संस्थांकडून मिळून छापलेल्या भाषणाच्या ५००० प्रतींचे सबनीस यांच्या निवासस्थानी होणाऱ्या कार्यक्रमात प्रकाशन करण्यात येणार आहे.