प्राची सोनवणे/ लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : राज्यामध्ये शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बंदचे तीव्र पडसाद दूध आणि भाजीपाला व्यवसायावर पडत आहेत. जुनागड येथून येणाऱ्या मदर डेअरीच्या दोन गाड्यांची आवक झाली असून, एरव्ही ही आवक ३० गाड्यांहून अधिक असल्याची माहिती व्यवस्थापकांनी दिली. कोल्हापूर येथून पोलीस बंदोबस्तात वारणा दुधाची आवक झाली असून, शुक्रवारी २० गाड्या दुधाची आवक झाल्याची माहिती वारणा दूध संघाचे एस.एम. पाटील यांनी दिली. राज्यातील नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर, इचलकरंजी, संगमनेर, सातारा आदी ठिकाणांहून मुंबईकरांसाठी दूधपुरवठा केला जातो. शेतकऱ्यांचा संप असाच सुरू राहिल्यास दुधाची आवक घटणार असल्याने दूध व्यावसायिकदेखील चिंतातुर झाले आहेत. ४८ ते ६० रु पये लीटर असणारे सुटे दूध २० रुपये वाढीव दराने विकले जात आहे. तर कंपन्यांचे दूधदेखील डेअरीवाले अधिक भावाने छापील किमतीहून अधिक दराने विकत आहेत. दुधाची आवक कमी झाल्याने काही कंपन्यांनी पावडर दुधाची निर्मिती करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे.अहमदनगरमधून दुधाची आवक होत असून शुक्रवारी संध्याकाळपासून दुधाची टंचाई जाणवणार आहे. संपामुळे ३० ते ४० टक्के आवक घटली असून संप सुरू राहिल्यास मात्र शनिवारपासून दूधटंचाई जाणवणार.- माधव पाटगावकर, व्यवस्थापक, प्रभात दूध
आजपासून दुधाचा तुटवडा जाणवणार, दूध डेअरीवाल्यांनी केली भाववाढ
By admin | Published: June 03, 2017 4:01 AM