आॅनलाइन लोकमत/संजय पाठकनाशिक, दि. 27 - महामार्ग म्हटले की अपघात असे समीकरण मानले जाते किंबहुना ग्रामीण भाग आणि शहरात कोठेही सध्या रस्ते वाहतूक सुरक्षित नाही, असे मानले जात असताना नाशिकमध्ये मात्र जिल्ह्यातील अपघातात घट झाली आहे. २०१५च्या तुलनेत गेल्या वर्षभरात सुमारे ४७४ अपघात कमी झाले आहेत. त्याबरोबरच मृत्यूचे प्रमाणही घटले आहेत.
राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्ग म्हटले की अपघात घडणे जणू अटळ झाले आहे. अलीकडच्या काळात अपघातांचे प्रमाण एवढे वाढले आहे की, कोठेही प्रवास करताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागला होता. शहरात आणि ग्रामीण भागातही अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. देशभरात सुमारे साडेपाच लाख अपघात होतात आणि त्यात सुमारे सव्वातीन लाख अपघात होत असतात. त्यामुळे अपघात हा देशपातळीवर चिंतेचा विषय ठरला आहे.
केंद्र सरकार त्यात लक्ष घालून प्रबोधन आणि कारवाई या दोन्ही पातळींवर प्रयत्न करत आहे. त्याला आधुनिकतेची जोड देण्याचे प्रयत्न सुरू असून, त्याअंतर्गतच ई- चलनसारख्या नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांना थेट नोटीस पाठवण्यासारखे अनेक प्रयोग सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे एकूणच अपघातासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल विविध अपघातांच्या विविध याचिकांचा विचार करता अपघातांवर उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. विविध घटनांच्या माध्यमातून किमान दहा टक्के अपघात दरवर्षी कमी करण्याचे आदेशच सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर राष्ट्रीय महामार्गांची संख्या आणि लांबी जास्त असल्याने अपघाताचे प्रमाण अधिक आहे. नाशिकमधून मुंबई-आग्रा रोड आणि नाशिक-पुणे महामार्ग जातात. त्यात पेठ तालुक्यातून जाणारा मार्ग बलसाडला मिळतो. तसेच सापुताराकडून गुजरातकडे जाणारा मार्ग आहे. अशा अनेक राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांमुळे अपघात सातत्याने घडत असतात. नाशिक जिल्ह्यात होणाऱ्या अपघातात साधारणत: ३५ ते ४० टक्के अपघात हे केवळ १५ ते ३५ वयोगटांतील तरुणाईचे होतात. त्यामुळे बेभान तरुणाईने वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, अशी अपेक्षा आहे.
नाशिकमध्ये विविध उपाययोजना आणि नियोजन केल्याने काही प्रमाणात बेकायदा वाहतुकींवर आळा घातल्याने अपघातात घट झाली आहे. २०१५ मध्ये नाशिक जिल्ह्यात एकूण ३ हजार ५१२ अपघात घडले होते. त्यात घट होऊन २०१६ मध्ये एकूण ३ हजार ३८ अपघात घडले. म्हणजेच एकूण ४७२ अपघातांमध्ये घट झाली आहे, तर २०१५ मध्ये एकूण १०२४ जणांचा बळी गेला होता. त्यात घट होऊन गेल्या वर्षी अपघातात ९९१ जणांचा बळी गेला असून, म्हणजेच ३३ने मृत्यू दर घटला आहे. त्यापूर्वी म्हणजेच २०१४ आणि २०१५ या दोन वर्षांची तुलना करता २०१५ मध्ये मात्र ८२६ अपघात कमी झाले होते. त्या तुलनेत मात्र २०१६ मध्ये अपघात वाढले, असे म्हणण्यास वाव आहे. २०१४ मध्ये एकूण ४ हजार ३३८ अपघात घडले होते, तर हे प्रमाण कमी होऊन ३ हजार ५१२ अपघात घडला होते. तर गेल्या वर्षी म्हणजेच २०१६ मध्ये ३,०३८ अपघात घडले आहेत. म्हणजेच २०१४ च्या तुलनेत २०१५ मध्ये ८२६ अपघात कमी झाले आणि २०१५ मध्ये झालेल्या अपघातांच्या तुलनेत २०१६ मध्ये ४७२ अपघात कमी झाले आहे.
२०१४ मध्ये एकूण ११०४ जणांचा अपघाती मृत्यू झाला होता, तर २०१५ मध्ये यात अल्पशी घट होऊन १०२४ जणांचा मृत्यू झाला. २०१६ मध्ये त्यात आणखी घट झाली आणि ९९१ जणांचा मृत्यू झाला. म्हणजेच २०१४ च्या तुलतेन २०१५ मध्ये ८० जणांचे प्राण वाचले, तर २०१५ च्या तुलनेत २०१६ मध्ये ३३ जणांचे प्राण अधिक वाचले आहेत. ही सर्वाधिक जमेची बाजू आहे.
जखमीच्या बाबत मात्र २०१४ सालात झालेल्या संख्येच्या तुलनेत २०१५ मध्ये वाढ झाली आहे. २०१४ मध्ये ४३३८ अपघातांमध्ये २,४४८ जखमी झाले होते. मात्र २०१५ मध्ये ३ हजार ५१२ अपघातांमध्ये २,६५३ जण जखमी झाले. म्हणजेच २०५ जण अधिक जखमी झाले. अर्थात २०१६ मध्ये ३,०३८ अपघातात २,११२ जण जखमी झाले आहेत. म्हणजेच २०१५च्या तुलनेत २०१६ मध्ये ५४१ प्रवासी कमी जखमी झाले ही अधिक जमेची बाजू आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अपघातांची संख्या दरवर्षी दहा टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट्य असून, त्यासाठी प्रादेशिक परिवहन विभाग, वाहतूक पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग यांसह अन्य विभागांच्या वतीने एकत्रितरीत्या प्रयत्नातून अपघात प्रवण क्षेत्र शोधून त्यावर उपाययोजना केली जाते. तसेच नियमांचे पालन करणे आणि प्रबोधन या सर्व बाबींवर भर दिला जातो, त्यामुळे अपघातांच्या संख्येत घट झाल्याचे शासकीय सूत्रांचे म्हणणे आहे.
गेल्या काही वर्षांत आरटीओने खूपच मोठी भूमिका वाहतुकीसंदर्भात बजावली आहे. त्यातून अपघात कमालीचे घटले आहे. साधारणत: दर वर्षी अपघातांची संख्या वाढत असताना ती गतवर्षीच्या तुलनेत कमी करणे हे खूपच मोठे यश आहे. गेल्या दोन वर्षांत नियम पालनाबरोबरच प्रबोधन आणि प्रत्यक्ष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. नाशिक शहरात वाहतुकीची चाचणी दिल्याशिवाय वाहन चालविण्याचा परवाना मिळत नाही. परंतु ग्रामीण भागातदेखील टॅबवर परीक्षा घेतल्या जातात. महाराष्ट्रात हे प्रथमच नाशिकला होत आहे. त्याचबरोबर नाशिक आरटीओने फेसबुक पेज तयार केले आहे. महाआरटीओ अॅप तयार केले आहे. त्याचप्रमाणे कॉलेजमध्ये वर्षांतून दोन ते तीन वेळा भेट देऊन प्रबोधन केले जाते. दोन वर्षांपूर्वी नाशिकमध्ये शंभर दुचाकीस्वारांमागे एकाच दुचाकीस्वाराने हेल्मेट घातल्याचे दिसत होते. मात्र आता हे प्रमाण खूप वाढले आहे. लोकांसाठी सरकारी यंत्रणा काम करते आहे, हे लोकांना समजल्याने लोकसहभाग वाढला आणि त्यामुळेच अपघातांचे प्रमाण घटले. - भरत कळसकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी, नाशिक