चंद्रकांत कित्तुरे -- कोल्हापूर --बॅँक खाते, शासकीय लाभाच्या योजना तसेच सरकारी दाखले अथवा कागदपत्रे मिळविण्यासाठी आधार कार्ड लागते. मात्र, शेतमाल खरेदी केल्यानंतर त्याचे बिल बँकेत जमा करण्यासाठीही आधार कार्ड लागत असल्याचा जावईशोध सांगली जिल्ह्यातील काही व्यापाऱ्यांनी लावला आहे. शेतकऱ्यांकडून ते आधार कार्ड आणि बॅँकेच्या पासबुकची झेरॉक्स प्रत घेत आहेत.कॅशलेसच्या दिशेने जाण्यासाठी केंद्र सरकारने रोखीच्या व्यवहारांवर अनेक निर्बंध घातले आहेत. त्यामुळे व्यापारी आता शेतमाल खरेदी केल्यानंतर त्याचे बिल धनादेशाने देत आहेत अथवा आरटीजीएसद्वारे शेतकऱ्यांच्या बॅँक खात्यात भरत आहेत. मात्र, आरटीजीएस करण्यासाठी ते शेतकऱ्यांकडून बॅँक पासबुक आणि आधार कार्डाची झेरॉक्स प्रत घेत आहेत. सांगली जिल्ह्यातील व्यापाऱ्यांकडून हा प्रकार सुरू असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जाते.याबाबत मिरज तालुक्यातील आरग येथील एका व्यापाऱ्याला विचारले असता तो म्हणाला, ‘तुम्ही शेतकरीच आहात की नाही याची खातरजमा करण्यासाठी बँकांना हीे आधार कार्डची झेरॉक्स द्यावी लागते. आम्ही बँकेत पैसे भरल्यानंतर तुमच्या बॅँकेत संबंधित बँकेचे कर्मचारी तुम्ही शेतकरी आहात की नाही याची खातरजमा करतात आणि मगच पैसे तुमच्या खात्यावर जमा करतात.’यावर तसा नियम नाही. आधार कार्डाशिवाय बँका खातेच उघडून देत नाहीत. मग पुन्हा तुमच्याकडे आधारची झेरॉक्स का द्यावयाची, असे विचारता सगळेच व्यापारी घेत आहेत, ते द्यावेच लागते, असे त्याचे म्हणणे होते. प्राप्तिकर खात्याच्या धसक्याने मागणीआपण खरेदी केलेला शेतमाल हा शेतकऱ्याचाच आहे याचा पुरावा प्राप्तिकर अधिकाऱ्यांना देता यावा यासाठी व्यापारी शेतकऱ्याकडे आधारची मागणी करीत असल्याचे सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीतील आणखी एका व्यापाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले. एखादा शेतकरी मोठ्या प्रमाणात धान्य घेऊन मार्केटमध्ये आला तर तो शेतकरीच आहे का याची खातरजमा करण्यासाठी, तसेच उद्या प्राप्तिकर चौकशी लागलीच तर पुरावा आपल्याकडे असावा यासाठी शेतकऱ्याकडे बॅँक पासबुक आणि आधार कार्डच्या झेरॉक्सची मागणी करीत आहेत, असेही त्याने सांगितले.कृती नियमबाह्ययाबाबत सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव प्रकाश पाटील यांना विचारले असता तसा कोणताही नियम नाही. शेतकऱ्यांकडून आधार कार्डची झेरॉक्स घेतली जात नाही. कोणी घेत असेल तर ते नियमबाह्य आहे, असे त्यांनी सांगितले.पैसे भरणाऱ्याचेच पॅन कार्ड हवेकोल्हापुरातील बॅँक आॅफ इंडिया बॅँकेचे जिल्हा व्यवस्थापक एस. जी. किनिंगे यांना विचारले असता ते म्हणाले, बँक खात्याची केवायसी करतानाच आधार कार्ड घेतलेले असते. बॅँका कोणत्याही खात्यात पैसे भरताना संबंधित व्यक्ती शेतकरी आहे की आणखी कोण याची चौकशी करीत नाहीत. मोठ्या रकमेसाठी पॅन कार्ड क्रमांक लागतो; पण जो पैसे भरतो त्याचा. ज्याच्या खात्यावर पैसे जमा करावयाचे त्याचे आधार कार्ड किंवा कोणतीही कागदपत्रे लागत नाहीत.
शेतमाल खरेदीलाही आधार सक्ती?
By admin | Published: March 29, 2017 1:03 AM