लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ठाकुर्ली येथे उड्डाणपुलाच्या कामासाठी घेण्यात आलेल्या सहा तासांचा ब्लॉक यशस्वी झाला असून, पूलासाठी गर्डर टाकण्याचे काम ही पूर्ण झाल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वतीने देण्यात आली. उपनगरांत झालेल्या मुसळधार पावसामुळे ब्लॉकला ४५ मिनिटे उशीर झाला मात्र नियोजित वेळेत कामगिरी फत्ते केल्याचा दावा मध्य रेल्वेच्या वतीने करण्यात आला. स्थानकांजवळील रेल्वे फाटक कायमचे बंद करण्यासाठी मध्य रेल्वेच्या वतीने ठाकुर्ली येथे गर्डर टाकण्याचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र हे गर्डर टाकताना अप-डाऊन धीम्या आणि जलद मार्गासह पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवरील वाहतूक पूर्णपणे थांबवणे अनिवार्य होते. परिणामी हे आव्हान पार करण्यासाठी रविवारी मध्य रेल्वेच्या वतीने सहा तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात आला होता. मात्र शनिवारी रात्री आणि रविवारी सकाळपर्यंत झालेल्या मुसळधार पावसामुळे गर्डर कामांला विलंब झाला.पावसाचा जोर कमी होत नसल्यामुळे काही काळ गर्डरचे काम पुढे ढकलण्याचा विचार मरे अधिकाऱ्यांकडून केला जात होता. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी परवानगी देताच ९.१५ वाजता सुरु होणारे काम अखेर १० वाजता सुरु झाले. सीएसएमटी - कर्जत / कसारा मार्गावर सुमारे ११०० लोकल चालविण्यात येतात. रविवार असल्यामुळे सुमारे ४४० लोकल फेऱ्या रद्द ठेवण्यात येतात. प्रवाशांसाठी ६६० लोकल चालवण्यात येतात. मात्र, ब्लॉक काळात सकाळी १० ते १५.४५ दरम्यानच्या बहुतांश लोकल रद्द करण्यात आल्याची माहिती मरेच्या वतीने देण्यात आली.
पावसामुळे ‘लेटमार्क’ पण कामगिरी फत्ते
By admin | Published: June 26, 2017 2:51 AM