अकोला, दि. ८: मागील एक महिन्यापासून विदर्भात सारखा पाऊस सुरू असल्याने पिकांची वाढ खुंटली असून, तण मात्र पिकांच्या वर गेल्याने शेतकरी चिंतातुर आहे; पण दोन दिवसांपासून पावसाने अल्पशी उसंत देताच शेतकर्यांनी पिकांच्या आंतरमशागतीला सुरुवात केली आहे. तब्बल एक महिन्यानंतर शेतातील तण काढण्यासाठी सर्वत्र निंदणाची कामे होत आहेत. परिणामी ग्रामीण भागातील महिला, मजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे.विदर्भात जवळपास ५0 लाख हेक्टर क्षेत्रफळ खरिपाचे आहे. पश्चिम विदर्भात यातील ३२ लाख हेक्टर क्षेत्र विविध खरीप पिकाखाली आहे. यामध्ये सोयाबीन सर्वाधिक १३ लाख हेक्टर आहे. त्या खालोखाल ८ लाख हेक्टर क्षेत्र कापूस, ४ लाख ९0 हजार हेक्टर तूर व उर्वरित इतर तृण व गळित धान्याची पेरणी झाली आहे; परंतु सतत ४0 दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने सूर्यप्रकाश नाही. परिणामी, पिकांच्या मुळांना प्राणवायू मिळाला नसल्याने पिके पिवळी पडत आहेत. सर्वाधिक नुकसान तूर या पिकाचे झाले आहे. मूग पिकावर रोग आला असून, सोयाबीनवर केसाळ अळी, हिरवी उंटअळी, मुळकूज, खुळकूज रोग आला आहे. सततच्या पावसामुळे हजारो हेक्टर क्षेत्रात पाणी साचले आहे. अतवृष्टीने जमीन खरवडून गेल्याने पिक ांचे नुकसान झाले आहे. यावर्षी सोयाबीनचे क्षेत्र सर्वाधिक आहे; परंतु सततच्या पावसामुळे कीड रोगांचा प्रादुर्भाव तर वाढलाच, या पिकांच्या मुळांना प्राणवायू पोहोचत नसल्याने पाने पिवळी पडली आहेत. यावर्षी धाडस करू न शेतकर्यांनी ज्वारीची पेरणी केली आहे. ज्वारी हे कमी पावसाचे पीक आहे; परंतु सततच्या पावसामुळे ज्वारी पीकही पिवळे पडले आहे. विशेष म्हणजे पावसामुळे तण वाढले असून, हे तण पिकांच्या वर गेल्याने उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे; पण दोन दिवसांपासून पावसाने उसंत देताच शेतकर्यांनी आंतरमशागतीच्या कामाला सुरुवात केली आहे. पावसामुळे शेतीची कामे बंद असल्याने मजुरीवरही परिणाम झाला होता. आता शेतातील तण काढण्यासाठी महिला, मजूर सध्या शेतात दिसत आहे.
पावसाने उसंत देताच मशागत, निंदणाच्या कामाला वेग !
By admin | Published: August 09, 2016 2:16 AM