मुंबई - आतापर्यंत एकही निवडणूक न लढविता महाराष्ट्राच्या राजकारणात एक अढळ स्थान निर्माण करणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुखांचे चिरंजीव आदित्य ठाकरे थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. यावर आता विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. रिमोट कंट्रोल निकामी झाल्यामुळेच युवासेना अध्यक्ष अदित्य ठाकरे निवडणूक लढवित असल्याचा खोचक टोला ओवेसींनी लगावला आहे. रिमोट कंट्रोलने राजकारण हाताळत असल्याचा आरोप शिवसेनेवर नेहमीच करण्यात येतो. यावरच ओवेसी यांनी सेनेला टोला लगावला आहे.
ठाकरे घराण्यात निवडणूक लढविण्याची परंपरा नाही, असा दावा याआधी ठाकरे कुटुबींयाकडून करण्यात येत होता. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेच नव्हे तर राज ठाकरे यांनी देखील आजपर्यंत निवडून लढवली नाही. परंतु, आता आदित्य ठाकरे वरळी मतदार संघातून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. आजपर्यंत कधीही निवडणूक न लढविणारे ठाकरे घराणे यावेळी विधानसभा लढविणार आहे. त्यामागे आदित्य यांना उपमुख्यमंत्री करण्याची शिवसेनेची योजना आहे. मात्र यावर आता विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे.याआधी ‘मातोश्री’तून रिमोटद्वारे सत्ता चालविण्याची ठाकरे कुटुंबीयांची पद्धत होती. मात्र आता रिमोट निकामी झाले आहे. रिमोट व्यवस्थीत काम करत नसल्यानेच आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचा टोला ‘एमआयएम’चे प्रमुख असोदुद्दीन ओवेसी यांनी लगावला.
1995 मध्ये युतीचे सरकार आले होते. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशी यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान केले होते. त्यावेळी बाळासाहेब रिमोटद्वारे सरकार चालवतात, असे आरोप होत होते. परंतु, मुख्यमंत्री बदलानंतर नारायण राणे रिमोटप्रमाणे काम करू शकले नाही, असंही राजकीय विश्लेषक सांगत आले आहेत. त्यानंतर शिवसेनेला सत्ता मिळाली नाही. मात्र आता खुद्द आदित्य ठाकरेच निवडणुकीच्या रिंगणात असून शिवसेनेची सुत्र हाती घेणार असं दिसत आहे.