नाशिक: महापालिका पंचवार्षिक निवडणुकीसाठी काल मंगळवारी मतदानप्रक्रिया पार पडली. गुरुवारी (दि.२१) मतमोजणी प्रक्रिया होणार असल्याने पंचवटी विभागातील सर्वच उमेदवारांसह त्यांच्या शेकडो समर्थकांचा जीव टांगणीला लागला आहे. बुधवारच्या दिवशी ज्या त्या उमेदवारांच्या समर्थकांनी परिसरातील नागरिकांच्या भेटी घेत तुम्हाला काय वाटते, कोणाची वर्णी लागेल, कोणत्या पक्षाचे उमेदवार निवडून येतील याबाबत माहिती घेत मतदानाची गोळाबेरीज सुरू करण्याचे काम केले.सोशल मीडियावर मतमोजणी होण्यापूर्वीच निकालाच्या एक्झिट पोलच्या पोस्ट व्हायरल झाल्याने अनेकांच्या छातीत धडकीच भरली आहे. सोशल मीडियावर झळकणाऱ्या निकालाच्या पोस्टमुळे कार्यकर्त्यांच्या तोंडचे पाणी पळाले तर स्वत: उमेदवारही काहीसे धास्तावले आहेत. सोशल मीडियावर पोस्ट झालेल्या एक्झिट पोलप्रमाणेच निकाल लागणार तर नाही ना, अशीच धास्ती सध्या ज्या त्या प्रभागातील उमेदवारांसह त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतल्याने काहींनी नाराजी व्यक्त करून उद्याच काय ते समजेल, अशा पोस्ट टाकून शांतपणे बसण्यात धन्यता मानली आहे. सोशल मीडियावर पोस्ट झालेल्या निकालात दिग्गज उमेदवारांसह काही नगरसेवकांचेही पत्ते कापले असल्याने आपण निवडून येणारच असे म्हणणाऱ्यांच्या उरात चांगलीच धडकी भरली आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियावर पोस्ट झालेल्या निकालात सर्व पक्षाचे पॅनल टू पॅनल निवडून येणार नाही त्यातच काही पक्षांचे ठराविक प्रभागात एकही उमेदवार निवडून येणार नाही, अशा याद्याच प्रसिद्ध झाल्याने उमेदवारांसह त्यांचे समर्थक व मतदारांचे बुधवारी सकाळी होणाऱ्या निकाल प्रक्रियेकडे लक्ष लागले आहे.
सोशल मीडियावरच्या निकालामुळे धास्ती
By admin | Published: February 22, 2017 5:56 PM