पुणे : गेल्या पंधरा दिवसांपासून पेट्रोल, डिझेल आणि गॅसची सतत दरवाढ होत असून, पेट्रोलच्या दराने नव्वदी, तर डिझेलच्या दराने ऐंशीचा टप्पा गाठला आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे (ए) शनिवारी बैलगाडीतून दुचाकी नेत निदर्शने करण्यात आली. कॅम्प परिसरातील नेहरू मेमोरियल जवळ असलेल्या हिंदुस्थान पेट्रोलियमच्या विभागीय कार्यालयासमोर आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी महागाई विरोधात घोषणा देत निषेध नोंदवला.
प्रसंगी पुण्याचे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, आरपीआयचे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, महाराष्ट्र पश्चिम विभाग अध्यक्ष परशुराम वाडेकर, कामगार नेते महेश शिंदे, मातंग आघाडीचे हनुमंत साठे, शहराध्यक्ष अशोक कांबळे, संपर्क प्रमुख अशोक शिरोळे, माजी शहराध्यक्ष महेंद्र कांबळे, युवक अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, निलेश आल्हाट यांच्यासह शेकडो कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले. इंधन दरवाढीचा निषेध म्हणून बैलगाडीत दुचाकी ठेवून आंबेडकर पुतळा ते एचपी पेट्रोलपंप अशी रॅली काढण्यात आली. तसेच इंधन दरवाढ त्वरित मागे घ्यावी अन्यथा येत्या काळात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा आरपीआयच्या वतीने देण्यात आला