मुंबई : मुंबई विमानतळावर एकच धावपट्टी असल्यामुळे येथे पर्यटक, प्रवासी कमी येतात. क्षमतेअभावी मोठी मागणी असूनही अनेक आंतराष्ट्रीय विमानांना मुंबई विमानतळावर उतरण्याची परवानगी देता येत नाही. त्यामुळे विकासदरावर परिणाम झाला आहे. नवी मुंबई विमानतळामुळे हा ताण कमी होणार असून राज्याचा विकासदर सुधारेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी व्यक्त केला.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम प्रलंबित असल्याबाबतचा तारांकित प्रश्न विक्रम काळे, किरण पावसकर, हेमंत टकले, नरेंद्र पाटील आदी सदस्यांनी विचारला होता. मुख्यमंत्री म्हणाले की, या विमानतळाचा सार्वजनिक-खासगी भागीदारीतून विकास करण्यात येणार आहे. प्रकल्पाला केंद्र सरकारची मान्यता मिळाली आहे. प्रकल्पाचे दोन टप्पे आहेत. त्यात प्री-डेव्हलपमेंट वर्क आणि प्रत्यक्ष प्रकल्पाचे काम, अशी कामे आहेत. प्री-डेव्हलपमेंटमध्ये डोंगर कापणे,नदीचा प्रवाह बदलणे आणि जमिनीत भराव टाकणे आदी कामे आहेत. त्यानंतर जमीन सपाट होण्यासाठी वेळ द्यावा लागणार आहे. ही कामे झाल्याशिवाय मुख्य काम सुरू करता येत नाही. त्यामुळे या कामाच्या निविदा काढून त्याचे कार्यादेशही दिले आहेत.हे काम दीड वर्ष चालणार आहे. प्रत्यक्ष कामासाठी दोन बोली मिळाल्या असून त्याला प्रकल्प व्यवस्थापन आणि अंमलाजावणी समितीची मान्यता घेण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
मुंबई विमानतळावरील एकाच धावपट्टीमुळे विकासदर घटला : मुख्यमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2017 3:51 AM