अतुल जयस्वाल/अकोला पाणीटंचाईचे संकट यंदा राज्यात जवळपास सर्वत्रच आहे. हंडाभर पाण्यासाठी मैलोगणती पायपीट करण्याची वेळ नागरिकांवर ओढावली आहे. या पाणीटंचाईचा फटका शासनाच्या हगणदरीमुक्त गावाच्या अभियानालाही बसला आहे. प्यायलाच पाणी नसल्याने शौचालयामध्ये कुठून टाकणार, अशी भूमिका घेत, ग्रामीण भागातील नागरिकांनी आता शौचविधीसाठी पुन्हा 'बाहेर'चा मार्ग पत्करल्याने टंचाईग्रस्त गावांमध्ये 'हगणदरीमुक्ती'चा फज्जा उडाल्याचे चित्र आहे.स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सन २0१५-१६ या वर्षात अकोला जिल्ह्यातील १६८ गावे हगणदरीमुक्त करण्याचे उद्दिष्ट जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने ठेवले होते. मार्च २0१६ अखेरपर्यंत यापैकी ६८ गावे हगणदरीमुक्त करण्यात यश मिळाले. ग्रामपंचायतींनीही ग्रामस्थांमध्ये वैयक्तिक स्वच्छतेबाबत जनजागृती करून घरोघरी वैयक्तिक शौचालय बांधण्यास ग्रामस्थांना प्रवृत्त केले. जिल्ह्यात हगणदरीमुक्त अभियानास बर्यापैकी प्रतिसाद मिळून ६८ गावे हगणदरीमुक्त घोषित करण्यात आली. गतवर्षी पावसाळय़ात अत्यल्प पाऊस झाल्याने यावर्षी भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्यातील खारपाणपट्टय़ातील गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली. जलस्रोत आटल्याने नागरिकांवर पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली. खांबोरा ६४ खेडी पाणीपुरवठा योजनेंतर्गत येणार्या गावांमध्ये तर अभूतपूर्व जलसंकट निर्माण झाले. प्यायला पाणी मिळणेही दुरापास्त झाले. या सर्व बाबींचा परिणाम हगणदरीमुक्त अभियानवर झाल्याचे चित्र या गावांमध्ये दिसून येत आहे. पिण्यासाठी पाणी विकत घ्यावे लागत आहे, तिथे शौचालयात टाकण्यासाठी पाणी कुठून आणणार, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांतील ग्रामस्थ शौचविधीसाठी गावाबाहेरील रस्ता, माळरान किंवा नदीकाठाचा वापर करताना दिसून येत आहेत.
पाणीटंचाईमुळे उडाला ‘हगणदरीमुक्ती’चा फज्जा!
By admin | Published: May 05, 2016 3:01 AM