पुणे : अरबी समुद्रात निर्माण झालेलं ओखी चक्रीवादळ आता अति तीव्र झाले असून, पुढील 12 तासांत ते वायव्य दिशेने सरकत आहे. रविवारी ते मुंबईपासून ८८० किमी अंतरावर होते, तर सुरतपासून ते १०९० किमी अंतरावर होते. पुढील १२ तासांत ते आणखीन वायव्याच्या दिशेने सरकण्याची शक्यता असून त्यापुढील ४८ तासानंतर त्याचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.
ओखी चक्रीवादळामुळे रविवारी सकाळी ताशी १४५ ते १५५ किमी वेगाने वारे वाहत होते. त्याचा सायंकाळी वेग थोडा कमी झाला होता. सोमवारी सकाळी त्याचा वेग आणखी कमी होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाचा परिणाम ६ डिसेंबरपर्यंत जाणवणार असून त्यानंतर ते विरत जाणार आहे.
या चक्रीवादळाबरोबर सुमात्रा बेट आणि दक्षिण अंदमान समुद्राजवळ आणखी एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊ लागला असून, येत्या ४८ तासांत तो सक्रिय होण्याची शक्यता असून पुढील ३ ते ४ दिवसात उत्तर तामिळनाडू, दक्षिण आंध्र प्रदेश किनारपट्टीच्या दिशेने येण्याची शक्यता आहे.
ओखी चक्रीवादळामुळे गोवा, दक्षिण महाराष्ट्र, कर्नाटक किनारपट्टीलगत वेगाने वारे वाहत असून समुद्र खवळलेला आहे. त्यामुळे मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, असा इशारा हवामन विभागाने देण्यात आला आहे. सोमवारी ४ डिसेंबरला कोकण, गोव्यात व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. ५ डिसेंबरला उत्तर कोकणात ब-याच ठिकाणी, दक्षिण कोकण, गोवा व उत्तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर, दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. ६ डिसेंबरला कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
या चक्रीवादळाने राज्यातील बहुतांशी भागातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात मोठी घट झाली आहे. राज्यात सर्वात कमी किमान तापमान गोंदिया 10.2 अंश सेल्सिअस नोंदविले गेले. पुणे शहर, मुंबई व परिसरात पुढील दोन दिवस आकाश अंशत: ढगाळ राहणार असून किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे़
राज्यातील प्रमुख शहरातील किमान तापमान (अंश सेल्सिअस) पुणे 14.9, जळगाव 12.5, कोल्हापूर 19.5, महाबळेश्वर 15.2, मालेगाव 14.6, नाशिक 14.4, सांगली 21.2, सातारा 17.6, सोलापूर 15.3, मुंबई 24, सांताक्रुझ 21.6, अलिबाग 22, रत्नागिरी 25.1, पणजी 24, डहाणु 21.6, भिरा 24, औरंगाबाद 14.2, परभणी 12, नांदेड 15, अकोला 14.5, अमरावती 14.2, बुलढाणा 13.8, ब्रम्हपुरी 11.7, चंद्रपूर 14.6, गोंदिया 10.2, नागपूर 10.4, वर्धा 11.7, यवतमाळ 13.8.