मुंबई : ग्रामीण भाग शहरी भागाला जोडणाऱ्या एसटी महामंडळाने मोठ्या प्रमाणात सुसूत्रीकरणाचे धोरण अवलंबले आहे. यातून अनेक लांब पल्ल्याच्या फेऱ्यांवर गदा आणली जात असून, त्याचा परिणाम प्रवाशांवर होत आहे. सुसूत्रीकरणातून लांब पल्ल्याच्या फेऱ्या कमी केल्या जात असतानाच, हळूहळू काही आगारांची संख्या कमी केली जाणार आहे. त्यासाठी राज्यातील आगारांचा आढावा घेतला जात असून, ३0 किलोमीटरच्या आत असणाऱ्या एकापेक्षा जास्त आगारांपैकी एक आगार बंद केले जाईल. यातून महामंडळाचा खर्च वाचविण्याचा प्रयत्न असला, तरी स्थानिकांना मात्र दुसऱ्या आगारात जाण्यासाठी पायपीट करावी लागणार आहे. प्रत्येक तालुक्यात एक आगार याप्रमाणे १९९0 सालापासून राज्यातील एसटी आगारांची संख्या हळूहळू वाढवण्यात आली. याप्रमाणे, महामंडळाचे राज्यात २५१ आगार आहेत. मात्र, आगारांची संख्या वाढत गेल्यावर मनुष्यबळही वाढत गेले आणि त्याबरोबर, देखभाल-दुरुस्तीसह अन्य खर्चही. त्यामुळे मोठ्या खर्चाला तोंड द्यावे लागले. त्यामुळे अनेक आगारही तोट्यात असल्याचे कारण पुढे करत, एसटी महामंडळाने फेऱ्यांचे सुसूत्रीकरण करण्यास सुरुवात केली आहे. एकाच ठिकाणाहून लांब पल्ल्याच्या फेऱ्या एकमेकांना समांतर धावत असल्याने, अशा फेऱ्या कमी करणाऱ्यावर महामंडळाकडून भर दिला जात आहे.लांब पल्ल्याच्या फेऱ्या बंद करून काही फेऱ्या एका आगारातून जवळच्याच आगारात वळत्या करून, टप्प्याटप्प्यात एकाच परिसरातील दोनपैकी एक आगार बंद करण्याचे नियोजन केले असल्याचे, एसटीतील सूत्रांकडून सांगण्यात आले. सुसूत्रीकरणासंदर्भात एसटी महामंडळाच्या गेल्या काही दिवसांत बैठकाही झाल्या. या बैठकीत आगारांचा आढावा घेण्यासंदर्भातही चर्चा करण्यात आली. ३० किमी अंतरातील एकापेक्षा जास्त असणाऱ्या आगारांबरोबर १०० पेक्षा कमी फेऱ्या असणारी आगारे टप्प्याटप्प्याने बंद होतील. बंद होणाऱ्या आगारातील फेऱ्या व देखभाल-दुरुस्ती ही जवळच्याच आगारात हळूहळू वळती केली जाणार आहे.