रावेत : आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य तलाठी, पटवारी, मंडलाधिकारी यांनी दोन दिवसांपूर्वी पुकारलेल्या बेमुदत बंदमुळे पुनावळे, रावेत, वाल्हेकरवाडी आदी परिसरातील शेतकरी आणि नागरिकांची फेरफार, सातबारा नोंदी, उत्पन्न व इतर दाखले आदी कामे ठप्प झाली आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांची गैरसोय होत आहे. नेहमी शेतकरी आणि नागरिकांनी गजबजणाऱ्या तलाठी कार्यालयाच्या आवारात शुकशुकाट पाहावयास मिळाला. या संपाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. सध्या आरटीईचे प्रवेश सुरू आहेत. त्यासाठी उत्पन्नाचा दाखला लागतो. पण, तलाठीच संपावर गेल्यामुळे उत्पन्नाचा दाखला मिळणे बंद आहे. आरटीई अंतर्गत माझ्या पाल्याला शाळेमध्ये प्रवेश घ्यावयाचा असून, त्याकरिता तलाठ्याकडील उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे. परंतु, तलाठी बेमुदत संपावर गेल्यामुळे मला उत्पन्नाचा दाखला मिळणे अशक्य आहे, असे सुहास भालेकर यांनी सांगितले. (वार्ताहर)
तलाठ्यांच्या संपामुळे नागरिकांची कामे ठप्प
By admin | Published: April 29, 2016 2:01 AM